Advertisement

वांद्र्याच्या ताज हॉटेलमागील अतिक्रमणे हटवून उद्यानाची जागा मोकळी


वांद्र्याच्या ताज हॉटेलमागील अतिक्रमणे हटवून उद्यानाची जागा मोकळी
SHARES

वांद्रे पश्चिम येथील ताज हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या ३५ अतिक्रमणांवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. ताज हॉटेलच्या मागे कांदेश्वरी उद्यानासाठी आरक्षित जागेवर ही अतिक्रमणे झाली होती. या अतिक्रमणांमुळे ताज हॉटेलच्या परिसराला विद्रुपता आली होती. त्यामुळे ताज हॉटेलला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी ३५ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.


५५ अतिक्रमणांपैकी ३५ अतिक्रमणे तोडली

वांद्रे पश्चिम परिसरातील ताज हॉटेलच्या मागे मनपा उद्यानासाठी सुमारे १ लाख ६८ हजार चौरस फुटांचा भूखंड राखीव आहे. या भुखंडांवर उद्भवलेल्या ५५ अतिक्रमणांपैकी ३५ अतिक्रमणे गुरुवारी करण्यात आलेल्या धडक कारवाईत तोडण्यात आली आहेत. तर उर्वरित २० अतिक्रमणे शुक्रवारी हटवण्यात येतील. या कारवाईसाठी महापालिकेचे २० कामगार - कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. ही कारवाई करण्यासाठी जेसीबी, डंपर आणि ट्रक यांसारख्या साधनांचा देखील वापर करण्यात आल्याची माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.


चायना गेटसह इतर हॉटेलच्या अनधिकृत हॉटेलवर हातोडा

बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान खार पश्चिम परिसरातील सुमारे ३ हजार चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. तिसाव्या रस्त्यावर असणाऱ्या 'चायना गेट' उपहारगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील लॅक्यूना बारचे सुमारे २ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे.

यामध्ये ३३ व्या रस्त्यावरील ‘मिनी पंजाब हॉटेल’ मधील ५५० चौरस फुटांचे बांधकाम, १६ व्या रस्त्यावरील ‘दर्शना - संजना’ गोल्ड शॉपमधील ३०० चौरस फुटांचे बांधकाम, याच रस्त्यावरील ‘पॉल रेस्टॉरंट’चे २२५ चौरस फुटांचे बांधकाम, ‘बॉम्बे बार्बेक्यू’चे ८०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामाचा समावेश आहे. तर खारदांडा परिसरातील घर क्र. २२०, ३०० आणि ३२६ चे सुमारे १०५० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामदेखील तोडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे सुमारे ३५ कामगार - कर्मचारी - अधिकारी यांच्यासह ८ पोलीस कर्मचारी घटनास्थळी कार्यरत आहेत, असे शरद उघडे यांनी सांगितले.


गजधरबंदमधील ६५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

परिमंडळ - ३ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कारवाईत गुरुवारी सांताक्रूझ परिसरातील गजधरबंद, एस. बी. पाटील मार्ग आदी परिसरातील ६५ अनधिकृत बांधकामेही हटवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या कारवाईसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेच्या पथकला लाभले. या कारवाईसाठी महापालिकेचे ३० कामगार - कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.



हेही वाचा

दहिसर रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणे दूर

अखेर अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा