...आणि रिक्षाचा प्रवास झाला गारेगार!

Mumbai  -  

कडक उन्हाळा असो, वा पावसाळा. वातानूकुलित वाहनांतून प्रवास करणं कोणाला आवडत नाही. ओला, उबेर, निळ्या रंगाची कूल कॅब टॅक्सी, यामुळे मुंबईकरांना ही सेवा मिळाली आहे. परंतु, मुंबई उपनगरातील महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या रिक्षामध्ये ही सुविधा नसल्याने त्यातून प्रवाशांचा गारेगार प्रवास होत नव्हता. हीच बाब लक्षात घेऊन विक्रोळीतील विलास पवार या रिक्षाचालकानं स्वत:च्या रिक्षात एअर कुलर सेवा देऊन प्रवाशांना इच्छित स्थळापर्यंत थंडगार प्रवासाचा अनुभव देऊ केला आहे. त्यांच्या या सेवेचं पूर्व उपनगरात कौतुक केलं जात आहे.

52 वर्षीय पवार यांनी रिक्षामध्ये अनेक बदल केले आहेत. रिक्षामध्ये त्यांनी स्वत: बनवलेला कुलर बसवला आहे. वर्षाचे बाराही महिने ते ही सेवा देणार आहेत. त्यांच्याकडे ठाण्याचंही परमीट असून, ते बदलापूरपर्यंत सेवा देत आहेत. भविष्यात असा एअर कुलर इतर रिक्षाचालकांना कमी पैशात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी बनवलेल्या कुलरमधील काही तांत्रिक चुका सुधारून ते त्याचं पेटंट घेणार आहेत.

अशी आहे रचना -

रिक्षावर त्यांनी एअर डक्ट बसवला आहे. प्रवासी बसतात त्याच्या समोर दोन पंखे बसवले आहेत. एक स्वयंचलित मोटर असून, त्या मोटरीद्वारे एअर कुलर सुरू होतो. यानंतर पंखे सुरू केले जातात आणि थंड हवा सुरु होते.

आरामदायी प्रवास आणि इतर सुविधा -

इतकंच नाही, तर प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी त्यांनी छोट्या सुविधाही रिक्षात दिल्या आहेत. त्यात पेपर स्टॅन्ड, पिण्यासाठी पाणी, प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली आहे. एड्सबद्दल जनजागृती करणारा संदेशही देण्यात आला आहे. तसेच अनाथ मुलांना मदत व्हावी, यासाठी दानपेटी लावली आहे. दानपेटी त्यांनी विक्रोळी पोलीस स्थानकाकडून सीलबंद केली आहे. 6 महिन्यांनंतर दानपेटी पोलिसांच्या समक्ष उघडण्यात येणार आहे.

चौथा प्रवासी बसू नये म्हणून नामी शक्कल!

रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी त्यांनी चालकाकडील सीटच्या बाजूला स्टेपनी (अतिरिक्त टायर) ठेवला आहे. त्यामुळे या रिक्षामध्ये नियमाप्रमाणे तीन प्रवाशांचीच वाहतूक होते. काही रिक्षाचालक 4 प्रवासी बसवतात. पण जर जागाच नसेल तर चौथा प्रवासी बसण्याचा प्रश्नच उद्भवू नये, त्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे.

लोकगीते आणि प्रतिमा

मराठी लोकगीतांची परंपरा जपली जावी, यासाठी रिक्षामध्ये लोकगीतं ऐकवण्यात येतात. इतिहास जपण्यासाठी रिक्षाच्या मागीच्या बाजूला म्हणजेच सामान ठेवण्यासाठी असणाऱ्या जागेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्यभिषेकाची प्रतिमा लावली आहे. प्रवासी आसनाच्या समोरीच्या बाजूला त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, परमवीर अब्दुल हमीद, राजगुरू, शहीद भगत सिंग, सुखदेव यांच्याही प्रतिमा लावल्या आहेत. तरुणांसमोर या सर्वांचा आदर्श रहावा, असा उद्देश यामागे आहे. रिक्षात मद्यपी आणि सिगारेट पिणाऱ्यांना बंदी आहे. रिक्षाची सजावट पवार यांनी स्वत: केली आहे.

मी गेल्या 18 वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. यापूर्वी फेब्रिकेशनच्या व्यवसायात होतो. त्यामुळेच मला एअर कुलरची कल्पना सुचली. ही सेवा प्रवाशांना आवडत आहे, याचा मला आनंद आहे.

विलास पवार, रिक्षाचालक

Loading Comments