Advertisement

बेस्ट आगारांमध्येही आता स्वस्त पार्किंगची सोय

बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बेस्ट आगारातील काही जागा मुंबईकरांना पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे.

बेस्ट आगारांमध्येही आता स्वस्त पार्किंगची सोय
SHARES

मुंबई महापालिकेने रस्त्यांवर अनधिकृतरित्या पार्क केलेल्या गाड्यांवर जबर दंड आकारण्यास सुरूवात केल्यापासून शहरातील पार्किंगचा प्रश्न चांगलाच तापला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता बेस्ट प्रशासन पुढं सरसावलं आहे. बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बेस्ट आगारातील काही जागा मुंबईकरांना पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे. यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटण्यासाेबतच प्रशासनाला चांगला महसूलही मिळू शकेल. 

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासन लवकरच मुंबईतील आगारांमध्ये दुचाकी आणि चारचाकींसाठी पार्किंगसाठी उपलब्ध करून देईल. येथील पार्किंगचे दरही आवाक्यातले असतील. याआधी देखील बेस्टने पार्किंगसाठी योजना तयार केली होती, परंतु पार्किंगचे दर जास्त असल्याने या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही.

दर कमी करण्यास मंजुरी

मंगळवारी झालेल्या बैठकीत बेस्ट समितीने पार्किंगचे दर कमी करण्यास मंजुरी दिली. याआधी १२ तासांसाठी कार पार्किंगकरीता १५० रुपये ठरवण्यात आले होते. या शुल्कात कपात करून हे दर ७० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. सोबतच टू व्हिलर आणि हेवी व्हिकलचं पार्किंग शुल्क देखील कमी करण्यात आलं आहे. 

तासांनुसार दर

या आधी पार्किंगचे दर १२ तासांसाठी किंवा महिन्याभरासाठी आकारण्यात येत होते. परंतु नव्या प्रस्तावानुसार पार्किंगचे दर ३ तास, ६ तास, १२ तास आणि १२ तासांहून अधिक असे विभागण्यात आले आहेत. सोबतच डेली पार्किंगचा पासही उपलब्ध करून देण्यात येईल. 

'असे' असतील दर

बेस्टच्या पार्किंगमध्ये ३ तासांसाठी टू व्हिलर पार्क करण्यासाठी २० रुपये द्यावे लागतील. तर कारसाठी ३० रूपये शुल्क असतील. हेच दर ६ तासांसाठी अनुक्रमे २५ आणि ४० रुपये होतील. तसंच १२ तासांसाठी अनुक्रमे ३० रुपये आणि ७० रुपये असतील. १२ तासांहून अधिक वेळेसाठी टू व्हिलरकरीता ३५ रुपये आणि कारसाठी ८० रुपये आकारण्यात येतील.  

मासिक पास अंतर्गत दररोज १२ तासांसाठी टू व्हिलरकरीता ६६० रुपये आणि कारकरीता १४५० रुपये द्यावे लागतील. तर दररोज २४ तासांसाठी टू व्हिलरकरीता १३२० रुपये आणि कारकरीता ३०८० रुपये द्यावे लागतील. हेही वाचा-

मुंबईत पार्किंग ठेकेदारांची मनमानी, छापील पावतीवर हाताने लिहिलं जातं शुल्क

हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेशRead this story in हिंदी or English
संबंधित विषय