Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ५,५०० रुपयांची उचल


बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ५,५०० रुपयांची उचल
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार वेळेवर होताना बोंब असताना आता या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ५,५०० रुपयांची उचल रक्कम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही आगाऊ रक्कम बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून तूर्तास कापली जाणार नाही, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मात्र, पुढील मार्चपर्यंत बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात विलीन होण्याची शक्यताच कमी असल्यामुळे ही आगाऊ रक्कम पुढील काही महिन्यांमध्ये कापून देण्याची नामुष्की बेस्ट प्रशासनावर ओढवणार आहे.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १४ हजार ५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ५,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकने घेतल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केलं. महापालिकेकडून बेस्टला देण्यात येणाऱ्या रकमेतून ही सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपये महापालिकेकडून देण्यात येतील, असं महापौरांनी सांगितलं. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात विलीन झाल्यास कर्मचाऱ्यांना ही रक्कम कापून द्यावी लागणार नाही. त्या दृष्टिकोनातून नियमांमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरु असल्याचं महापौर म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पुढाकार घेऊन सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह गटनेत्यांच्या बैठका घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.


'रक्कम कापू नका'

महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम न देता त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान म्हणून दिलं जावं. ही रक्कम भविष्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाऊ नये, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही हीच मागणी करत आगाऊ रक्कम देऊन पुढे ती रक्कम कापून घेतली जाऊ नये, अशी सूचना केली आहे.

बेस्टची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचारी संघटना दिवाळीसाठी बोनस मिळावा, यासाठी आग्रही आहे. आर्थिक स्थितीमुळे बेस्ट बोनस देण्याच्या स्थितीत नाही. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेलाही बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनस ऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरुपात (अॅडवान्स) कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल', असं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं.

सुधारणांची प्रक्रिया सुरु झाल्यास आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरु न झाल्यास दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, असे सूतोवाचही आयुक्तांनी केले आहेत.


कामगार संघटनांची सेटिंग

बेस्ट वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार सेना यांनी सानुग्रह अनुदान न दिल्यास भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बसेसचा संप केला जाईल, असा इशारा दिला होता. परंतु, ही कामगार संघटनांची सेटिंग असून उपोषणाचं नाटक करून महापौरांना याची घोषणा करायला सांगून सानुग्रह अनुदान पदरात पाडून घेतलं जात आहे.


पैसे सोमवारनंतरच

प्रत्यक्षात हीच उचल दिवाळीपूर्वी कामगारांना देता आली असती. परंतु, दिवाळीच्या दिवशी ही घोषणा केल्यामुळे आता प्रत्यक्षात दिवाळीनंतर अर्थात सोमवारनंतरच कामगारांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कामगारांना या आगाऊ रकमेचा काहीही उपयोग होणार नसून उलट कामगार संघटनांची बँक खाती वर्गणीच्या स्वरुपात भरण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने मदत केल्याचं दिसून येत आहे.हेही वाचा - 

भाऊबीजनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

'एक उपाशी, तर दुसरा खातो तुपाशी', एसटी संपाचा फायदा घेत खासगी वाहनांची दरवाढ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा