सिनेमागृहात दुमदुमणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष?


SHARE

मुंबईतील प्रत्येक सिनेमागृहात राष्ट्रगीतासोबतच 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा नारा देण्याची मागणी होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल अचानक प्रेम उफाळून आलेल्या भाजपाकडून ही मागणी होत आहे. सिनेमागृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीताची ध्वनीफित प्रदर्शित झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या कार्याची महती दर्शवणारी चित्रफित दाखवून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दाखवण्यात यावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका शीतल गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


कारण काय?

मातृभूमीबद्दल आदर बाळगण्यासाठी देशातील सिनेमागृहामध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीताची ध्वनीफित वाजवण्यात येते आणि यावेळी सर्व प्रेक्षक उभे राहतात, त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती निरंतर राहावी. त्यांच्याबद्दल आदर कायम राहावा म्हणून महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी त्यांची चित्रफित दाखवून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची घोषणा करण्याची मागणी गंभीर यांनी केली.


काय आहे निवेदनात?

महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचं अतुल्य योगदान आहे. उत्तम शासक, शूर व मुत्सद्दीपणा, गनिमीकावा, आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय व विशेषत्वानं महाराष्ट्राच्या इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंविरोधात लढयाकरता महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून तत्कालिन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याचं बीजारोपण केलं.

त्यांनी उत्तम शासनाचं उदाहरण भावी राज्यकर्ते यांच्यासमोर ठेवलं. अशा थोर नेत्याची स्मृती निरंतर राहणं आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या कार्याचा आदर्श समाजामध्ये कायम राहणं गरजेचं असल्याचं शीतल गंभीर-देसाई यांनी म्हटलं आहे. 

व्हिक्टोरिया टर्मिनसचं नामकरण शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं. परंतु महाराजांच्या नावापुढे छत्रपती ही उपाधी लावण्यात आली नव्हती. ही बाब रेल्वेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी महाराजांच्या नावापुढे छत्रपती नावाचा उल्लेख करण्यात आला. तसंच काहीस मुंबई विनातळाच्याही बाबतीत झालं. आता भाजपाकडून महाराजांचा जयघोष सिनेमाघरांमध्ये करण्याची मागणी होत आहे.


 


हेही वाचा-

मुंबई एअरपोर्टच्या नावात सुधारणा, 'महाराज' उपाधीचा समावेश

वांद्रे टर्मिनसला द्या बाळासाहेबांचं नाव, खा. पूनम महाजन यांची मागणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या