Advertisement

कंत्राटदारांची पापे धुणारी वॉशिंग मशिन कोणती - भाजपाचा सवाल


कंत्राटदारांची पापे धुणारी वॉशिंग मशिन कोणती - भाजपाचा सवाल
SHARES

मुंबईतील रस्ते तसेच नालेसफाईच्या भ्रष्टाचारात दोषी ठरलेल्या आणि काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांनी नावे बदलून पुन्हा महापालिकेत एन्ट्री केली आहे. मागील काही दिवसांपासून काळ्या यादीतील संलग्न कंपन्यांना कामे दिली जात आहेत.

 त्यामुळे पारदर्शकतेच्या बाता ठोकल्या जाणाऱ्या महापालिका आयुक्तांच्या नजरेखालून हे सर्व प्रस्ताव जात असून तेच अशा प्रस्तावांवर स्वाक्षरी करत त्यांना प्रवेश देत आहेत. त्यामुळे कोणत्या वॉशिंग मशिनमध्ये काढून या कंत्राटदारांना मिस्टर क्लिन बनवलं जात आहे, असा सवाल भाजपाने केला आहे.


कंत्राटदार मागच्या दाराने 

पूर्व उपनगरातील परिमंडळ ६मधील विविध रस्त्यांची पावसाळ्यापूर्वीची देखभाल व तातडीची कामे करण्यासाठी फोर्स कंपनी पात्र ठरली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता प्रभाकर शिंदे यांनी ही कंपनी काळ्या यादीत टाकलेल्या आर. ई. इन्फ्रा व आकाश इंजिनिअरींग यांची संलग्न कंपनी असल्याचा आरोप केला. एका बाजुला उदय मुरुडकर, अशोक पवार यांच्यासारखे अधिकारी ज्या कंत्राटदारामुळे गजाआड झाले त्याच कंत्राटदारांशी प्रशासनाचे अधिकारी वाटाघाटी करत त्यांना कामे बहाल करत आहेत. म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना शिक्षा आणि कंत्राटदारांना पुन्हा मागच्या दाराने प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे याची चौकशी होईपर्यंत हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी शिंदे यांनी केली.


कारवाईची छडी कशी बदलली 

याला पाठिंबा देत भाजपाचे मनोज कोटक यांनी या कंत्राटदारांना कुठल्या वॉशिंग मशिनमधून बाहेर काढलं जातंय असा सवाल केला. काळ्या यादीतील आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीशी संलग्न प्रिती, स्पेको आणि शाह अँड पारिख या कंपन्या आहेत, आर. ई. इन्फ्रा या कंपनीशी संलग्न फोर्स ही कंपनी आणि रेल्वेने काळ्या यादीत टाकलेल्या लँडमार्क कंपनीला कामे दिली जात आहे. यापूर्वी नाहुरच्या पुलाचे काम दिलेल्या सनराईज या कंपनीचे काळ्या यादीतील रेलकॉन कंपनीशी संबंध असल्याने त्यांचे कंत्राट रद्द केलं. मग कारवाईची ही छडी अचानक कशी बदलली असा सवाल कोटक यांनी केला.

असे प्रस्ताव आयुक्तांकडून येतात. त्यामुळे काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामे देण्याचे आयुक्तांचं धोरण बदललं का असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. काळ्या यादीतील कंत्राटदारांना आपण कामे देतोच कसे असा सवाल भाजपाच्या अभिजित सामंत यांनी केला.



हेही वाचा - 

खड्डयात कोल्डमिक्सऐवजी चक्क पेव्हरब्लॉक

अंधेरी पुलाच्या दुघर्टनेचं खापर भाजपानं फोडलं पालिकेवर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा