Advertisement

मुंबईतील १० टक्के पाणीकपात आठवडाभर पुढे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायींची होणारी गर्दी लक्षात घेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी, महापालिकेनं पाणीकपात पुढे ढकलली आहे.

मुंबईतील १० टक्के पाणीकपात आठवडाभर पुढे
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं अनुयायी मुंबईत येतात. दादरमधील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, यंदा यावेळी पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीनिमित्त महापालिकेकडून पाणीकपात करण्यात येणार होती. परंतु, आंबेडकर अनुयायींची होणारी गर्दी लक्षात घेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी, महापालिकेनं पाणीकपात पुढे ढकलली आहे. त्यानुसार, ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत पाणीकपात करण्यात येणार आहे.

पाणीकपातीचा निर्णय

पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मंगळवार ३ डिसेंबरपासून संपूर्ण मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. या दुरुस्तीचं काम आठवडाभर चालणार होतं. त्यामुळं ९ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना १० टक्के कमी दाबानं पाणीपुरवठा होणार होता. परंतु, ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर पश्चिम येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी उपस्थिती लावणार आहेत.

महापालिकेकडे मागणी

अनुयायी मुंबईत येण्यास सुरुवातही झाली आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही पाणीकपात पुढे ढकलण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं पालिका प्रशासनाकडे केली होती. ही मागणी मान्य करीत महापालिकेनं पाणीकपात पुढे ढकलली आहे.

पाण्याचा जपून वापर

त्यानुसार ३ डिसेंबरऐवजी ७ डिसेंबरपासून पाणीकपात सुरू होणार आहे. पुढील आठवडाभर म्हणजे १३ डिसेंबरपर्यंत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत कमी दाबानं पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे.



हेही वाचा -

सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे

पावसाचं पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा वापर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा