Advertisement

महापालिका प्रशासनाला मराठीचं वावडं, बहुतांश कामकाज चालतं इंग्रजीतूनच

महापालिका आयुक्तांच्या कार्यालयापासून ते सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कामकाज हे इंग्रजी भाषेतूनच चालत असून महापालिकेतील कामकाज केवळ ५० टक्केच मराठीत चालत असल्याची बाब दिसून येते. त्यातच आता ऑनलाइन कारभाराच्या नावाखाली मराठी भाषेचा गळाच घोटला जात आहे.

महापालिका प्रशासनाला मराठीचं वावडं, बहुतांश कामकाज चालतं इंग्रजीतूनच
SHARES

मुंबई महापालिकेचं कामकाज १०० टक्के मराठीतूनच व्हावं, अशा प्रकारचं परिपत्रक असलं तरी प्रत्यक्षात या परिपत्रकालाच हरताळ फासला जात आहे. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयापासून ते सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कामकाज हे इंग्रजी भाषेतूनच चालत असून महापालिकेतील कामकाज केवळ ५० टक्केच मराठीत चालत असल्याची बाब दिसून येते. त्यातच आता ऑनलाइन कारभाराच्या नावाखाली मराठी भाषेचा गळाच घोटला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभार मातृभाषेतून व्हावा, अशा प्रकारचा नियम असून त्यासाठी कामकाजाची भाषा ही १०० टक्के मराठीच असावी अशा प्रकारचं परिपत्रक महापालिकेच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने सर्व खात्यांना जारी करण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय कामकाज अशा प्रकारच्या दोन्ही पटलावर मराठी भाषेची गळचेपी केली जात आहे. लोकप्रतिनिधींचा कल सर्व कारभार मराठीत करण्याकडे असला, तरी अमराठी नगरसेवक इंग्रजी किंवा हिंदी भाषेलाच प्राधान्य देताना दिसतात.


कारभारात इंग्रजी, हिंदीचा वापर

प्रशासनाचे प्रमुख असलेले महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयातून होणारा तसेच विभाग प्रमुखांकडून होणारा सर्व पत्रव्यवहार हा बहुतांशी इंग्रजीतून केला जात आहे. प्रशासकीय स्तरावर होणाऱ्या कामकाजात ५० टक्क्यांपेक्षा अधिक कामकाज हे अमराठी भाषेतूनच केलं जात आहे. प्रशासनाच्यावतीने जाणीवपूर्वक अमराठीतून पत्रव्यवहार केला जात आहे. नगरसेवकांना दिली जाणारी पत्रे मराठीतून दिली जात असली तरी अनेक आदेश, कार्यादेश तसेच सूचना या सर्व अमराठीतूनच दिल्या जात आहेत.


इतर विभागाची काय अवस्था?

महापालिकेचा विधी विभाग आणि विकास नियोजन विभागाचं कामकाज तर १०० टक्के इंग्रजीतून केलं जातं. हा अपवाद मानायचा ठरला, तरी अभियांत्रिकी विभागाच्या रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मल:निस्सारण वाहिन्यांसह सर्व खात्यांचा ८० टक्क्यांपेक्षाही अधिक कारभार इंग्रजी भाषेतूनच केला जातो. या सर्व विभागांच्या तसेच खात्यांच्या निविदाही इंग्रजी भाषेतून काढल्या जात असून ऑनलाइन कारभाराच्या नावाखाली मराठी भाषेचा गळा घोटून इंग्रजी भाषेला अधिक महत्व देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. 'ईझ आॅफ डुईंग' बिझनेसअंतर्गत सर्व प्रकारच्या मंजुऱ्या, परवाने इंग्रजीतूनच दिले जात असल्याने या खात्यांमधून मराठी भाषा केव्हाच हद्दपार झाली आहे.


८० टक्के मराठी, २० टक्के इंग्रजी

या संदर्भात सामान्य विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेचं कामकाज १०० टक्के मराठीतून असावं, असा नियम असल्यामुळे त्याचं पालन केलं जात आहे. परंतु काही महत्वाच्या कामांसाठी इंग्रजी भाषेतून व्यवहार करावा लागतो. त्यामुळे ८० टक्के मराठी आणि २० टक्के इंग्रजीतून कामकाज होत असेल, असं त्यांनी सांगितले. विधी आणि विकास नियोजन विभागाचे बहुतांशी कामकाज हे इंग्रजीतूनच करावं लागतं. परंतु तरीही जेवढं शक्य आहे, तिथे मराठीतून करण्याचा प्रयत्न केला जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


मराठी नगरसेवक अधिक तरीही…

मुंबई महापालिकेतील २२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्यांसह २३२ नगरसेवक आहेत. परंतु यापैकी महापालिकेत १४४ मराठी नगरसेवक निवडून आले आहे. तर मागील महापालिकेच्या तुलनेत यावेळी ६४ चे ८३ अमराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत. अमराठी नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्याकडूनही मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेतून पत्रव्यवहार करण्याकडे त्यांचा कल वाढताना दिसत आहे.



हेही वाचा-

कसला अभिमान? मराठी अभिमान गीतातलं कडवंच गाळलं

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी..!

राज्‍यातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ मुंबईत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा