Advertisement

म्हणून खार-सांताक्रूझ यावर्षीही तुंबणार!

या पम्पिंग स्टेशनचं काम करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीला यापूर्वी महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे.

म्हणून खार-सांताक्रूझ यावर्षीही तुंबणार!
SHARES

ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या पम्पिंग स्टेशनच्या कामांपैकी सांताक्रूझ येथील गझधर बंद येथील पम्पिंग स्टेशनचं काम अद्यापही रखडलेलं आहे. विद्यमान कंत्राटदाराने काम करण्यास असर्थता दर्शवल्याने आता या कामासाठी नव्याने निविदा मागवल्या जाणार आहेत. त्यामुळे यावर्षीही खार-सांताक्रूझ भागातील नागरिकांना तुंबणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.


कंपनी काळ्या यादीत

या पम्पिंग स्टेशनचं काम करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीला यापूर्वी महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे.


माहुलचं काम कागदावरच

२६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर चितळे समितीच्या शिफारशीनुसार ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत इर्ला, हाजी अली, क्लीव लँड बंदर, लव्हग्रोव्ह बंदर, ब्रिटानिया आऊटफॉल, गझधरबंद आणि माहुल नदी आदी ठिकाणी पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी माहुल नदीच्या जागेचा वाद असल्याने या पम्पिंग स्टेशनच्या उभारणीचं कामही कागदावरच आहे.

मात्र, २ वर्षांपूर्वी हिंदमाता सिनेमाजवळ पाणी तुंबत असल्याने येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन सुरु करण्यात आलं. तर गझधरबंद पम्पिंग स्टेशनचं काम हाती घेण्यात आलं होतं.


३५ टक्केच काम पूर्ण

सांताक्रूझ येथील गझधरबंद पम्पिंग स्टेशनचं काम २०१४ ला हाती घेण्यात आलं होतं. सुमारे १२५ कोटींच्या कामासाठी प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीला २ वेळा मुदतवाढ देऊनही त्यांना हे काम पूर्ण करता आलं नाही. आतापर्यंत केवळ ३५ ते ४० टक्केच काम पूर्ण करता आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी महापालिकेच्या पर्जन्य जलविभागाच्यावतीने या कपंनीला दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


मुदतवाढ देऊनही काम सुरू नाही

या कंपनीला ३१ मे २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत वाढवून दिली होती. मात्र, त्यानंतरही या कंपनीने काम सुरु न केल्यामुळे या कंपनीला आता काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असं पर्जन्य जलविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याबरोबर झालेलं कंत्राटही रद्द करण्यात येणार आहे.


२० टक्के रक्कम कापून घेणार

यापूर्वी दोन वेळा दिलेल्या मुदतवाढीमुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केलेली असून त्यांच्या कंत्राटातून २० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत या कंत्राटदाराने ४० कोटी रुपयांपर्यंत काम पूर्ण केलं आहे. मात्र, या कंपनीकडून काम करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे त्यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने अर्जही करण्यात आला होता. परंतु याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.


नव्याने निविदा

त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून उर्वरीत काम नवीन कंपनीकडून करून घेण्यासाठी नव्याने निविदा मागवण्या येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात खार, खार दांडा, सांताक्रूझ आदी भागांमध्ये पाण्याची समस्या कायम राहिल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खारमधील जयभारत सोसायटीसह येथील सखल भागांमध्ये पाणी तुंबत असल्याने याठिकाणी पम्पिंग स्टेशनचं काम हाती घेण्यात आलं होतं. परंतु हे काम अपेक्षित वेळेत पूर्ण झालं असतं तर यंदाच्या पावसापासून नागरिकांना दिलासा मिळणार होता.



हेही वाचा-

हिंदमाता परिसरात पाणी तुंबणारच! महापालिकेच्या अधिकाऱ्याचीच कबुली

गुजरातमुळे मुंबईवरील पाणी शुद्धीकरणाचा भार वाढला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा