Advertisement

हिंदमाता परिसरात पाणी तुंबणारच! महापालिकेच्या अधिकाऱ्याचीच कबुली


हिंदमाता परिसरात पाणी तुंबणारच! महापालिकेच्या अधिकाऱ्याचीच कबुली
SHARES

परळमधील हिंदमाता सिनेमागृहाच्या चौकात ब्रिटानिया आऊटफॉल पम्पिंग स्टेशनच्या उभारणीनंतर पावसाचे पाणी तुंबणार नाही, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी यंदाही हिंदमाता पाण्याखाली जाणार आहे. हिंदमाताजवळील ब्रिटिशकालीन वाहिन्यांमध्ये झाडांची मुळे रोवली असल्याने पाण्याच्या प्रवाहात बाधा येत आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यंदाही या भागात पाणी तुंबून मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल, अशी स्पष्ट कबुलीच महापालिकेच्या पर्जन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीत दिली आहे. एवढेच नव्हे, तर भरती आणि ओहोटीच्या वेळेतील फरक आणि त्यावेळी मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत पाणी भरणारच, असेही सांगायला हे अधिकारी विसरले नाहीत.


नालेसफाईचा गाळ डम्पिंग ग्राऊंडवर

स्थायी समितीच्या बैठकीत गोरेगावमधील वालभट नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजुरीला आला असता विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईतील नालेसफाईबाबत चिंता व्यक्त केली. 'नालेसफाईचे काम योग्य पद्धतीने केले जात नसून त्यातील गाळ काढून मुंबईबाहेर न टाकता कांजूरमार्ग आणि मुलुंड मधील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्रिटानिया आऊटफॉल पम्पिंग सुरु झाल्यानंतरही हिंदमाता परिसरात पाणी तुंबत आहे. आणि आता येथील पर्जन्य जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात येत असल्याचे सांगत यंदाही याठिकाणी पाणी भरणार असल्याची भीती व्यक्त केली.


'मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल'

यावेळी प्रशासनाकडून उत्तर देताना पर्जन्य जलविभागाचे उपप्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनी विभागाची बाजू मांडली. 'ब्रिटानिया आऊटफॉल पम्पिंग स्टेशन कार्यान्वित केल्यामुळे या ठिकाणी कंबरेइतके तुंबणारे पाणी आता गुडघ्याएवढे तुंबत आहे. परंतु, या ठिकाणी असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पर्जन्य वाहिन्यांमध्ये ५० वर्ष जुन्या झाडांची खोडे व मुळे पसरली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जातो. यासाठी नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.


सत्ताधारी कंत्राटदारांची बाजू घेतायत?

नालेसफाईचे काम झाले असो किंवा नसो. मुसळधार पाऊस आणि भरती व ओहोटीच्या वेळेत कमी अंतर असेल, तर पाणी तुंबणारच, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत नाल्यातील गाळ डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याने याला शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी हरकत घेतली आणि ते सभागृहाची दिशाभूल करत असल्याचे सांगितले. 'नालेसफाईची कामे होत नाहीत. गाळ काढून आपल्याच डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात असताना सत्ताधारी पक्ष कंत्राटदारांची बाजू घेत आहे, हे गंभीर आहे,' असा आरोप सपाचे रईस शेख यांनी केला. त्यामुळे या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.


'हीच ८० टक्के नालेसफाई का?'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी भरलेल्या नाल्यांची छायाचित्रे बॅनरद्वारे झळकावून 'हीच ८० टक्के नालेसफाई का?' असा सवाल केला. मोठ्या नाल्यांची सफाई कामगार आत उतरून करत आहेत, अशीही छायाचित्र झळकून 'हीच का मशिनरीद्वारे केली जाणारी सफाई?' असा सवाल त्यांनी केला. 'नालेसफाईचा भ्रष्टाचार उघड झालाच आहे, आता नवीन घोटाळा होईल', अशी भीती काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी व्यक्त केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 'मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागेल', असे विधान करणाऱ्या अधिकाऱ्याची कानउघाडणी करत 'अशी भाषा पुन्हा वापरु नये', असे खडे बोल सुनावले.



हेही वाचा

नालेसफाईत कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा - महापौर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा