पालिकेनं दुय्यम अभियंत्यासह आणखी २ कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून अवैधरित्या सूट देण्यात येत होती. याबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते, असा आरोप या तिघांवर आहे.
विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या आणि अवैध पद्धतीनं क्वारंटाईनमधून सूट देत होता. त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब समोर आली. सीआयएसएफच्या मदतीनं झडती घेवून त्यांच्याकडून बनावट शिक्के आणि रक्कम जप्त केली.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारसह महानगरपालिका प्रशासनानं उपाययोजना केल्या.
युकेसह, इटली, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि मध्य-पूर्व देशांमधून हवाई मार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्यात येत आहे.
त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत.
क्वारंटाईनमधून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याची बाब पालिकेला लक्षात आली. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधितांना बारकाईनं देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिलं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला देखील सतर्क करण्यात आले आहे. त्यानंतर हा गैरप्रकार समोर आला.
हेही वाचा