Advertisement

महापौर निवासाची जागा ग्रीन झोनऐवजी आता निवासी पट्ट्यात, पण इथंच खरी गोची


महापौर निवासाची जागा ग्रीन झोनऐवजी आता निवासी पट्ट्यात, पण इथंच खरी गोची
SHARES

शिवाजी पार्क येथील मुंबईच्या महापौरांच्या निवासाची जागा शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्यात आल्यानंतर या जागेचं आरक्षण बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महापौर निवासाची जागा हरित क्षेत्रात मोडत असल्यामुळे स्मारकाचं बांधकाम करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या जागेचा रहिवासी क्षेत्रात समावेश करून त्यावर स्मारकाचं आरक्षण टाकण्यात येत आहे.


स्मारक उभारणीत मोठी अडचण

याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. मात्र, ही जागा सीआरझेडमध्ये मोडत असल्याने केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागाची आवश्यक सहमती मिळाल्यानंतरच आरक्षण फेरबदलावर निर्णय घेतला जाईल, अशीच सूचना पाठवून महापालिकेने स्मारक उभारणीत मोठी अडचण निर्माण करून ठेवली आहे.

मुंबईतील जी/उत्तर विभागाच्या मंजूर पुनर्रचित विकास आराखड्यात माहीम विभागातील भूकर क्रमांक ५०१, ५०२ पै, १४९५ हे महापौर बंगला याकरता आरक्षित आहे. परंतु या भूभागाच्या आरक्षणात बदल करून त्या जागेवर ‘दि. बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक’ असं आरक्षण ठेवण्याची सूचना नगरविकास खात्याला कळवली आहे.


असा झाला प्रस्ताव सादर

मुंबईचा नवा प्रारुप विकास आराखडा २०१४-३४चा महापालिका सभागृहाने मंजूर करून नगरविकास खात्याकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. त्यानुसार नगरविकास खात्याने यात बदल करण्यासाठी पुन्हा नागरिकांकडून काही हरकती व सूचना असल्यास मागवल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने आरक्षण फेरबदलाच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६चे कलम ३७(१एए) अन्वये नियोजन प्राधिकरणाने एक महिन्याच्या आत आपल्या सूचना व हरकती नगररचना उपसंचालकांकडे सादर करणं बंधनकारक आहे. परंतु कालावधी कमी असल्यामुळे सुधार समिती व महापालिकेची मंजूरी घेऊन सूचना व हरकती शासनाकडे सादर करणं शक्य नसल्याने या दोन्ही सभागृहांची मान्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाने १६ ऑक्टोबर २०१७ ला आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला.


कुठले बदल सुरू?

महापौर बंगल्याची जागा ही हरित पट्ट्यात असल्यामुळे ती निवासी पट्ट्यात आणून त्यावर स्मारकाचं आरक्षण टाकण्यात येत आहे. परंतु ही जागा सीआरझेडने बाधित असल्याने फेरबदलानंतर सीआरझेडच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागीय सहमती घेण्यात येईल. या सर्व खात्यांची आवश्यक ती सहमती घेतल्यानंतरच या फेरबदलाव अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशाप्रकारची हरकती व सूचना नोंदवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासन किंवा शासनाने नियुक्त केलेली संस्था हे दि. बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक आरक्षणासाठी समुचित प्राधिकरण राहतील, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.


महापौर निवासाचा प्रश्न अधांतरीतच

महापौर निवासाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा ठराव सुधार समिती व महापालिका सभागृहाने मंजूर केला आहे. त्यामुळे स्मारकाला जागा देण्यात आली असली तर आरक्षणाचा प्रश्न होता. त्यानुसार आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव नगरविकास खात्याला पाठवला आहे. महापौरांच्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक होणार असलं तरी महापौरांच्या निवासाचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. परंतु निवासाचा प्रश्न न सोडवता बाळासाहेबांच्या स्मारकाची तयारी शिवसेना, सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून जय्यत सुरु आहे.हेही वाचा-

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवसेनेने पसरले महापालिकेकडे हात

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधातील याचिका फेटाळा: राज्य सरकार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा