Advertisement

फेरीवाल्यांवर कारवाई कडक; दंड फक्त 114 रुपये!


फेरीवाल्यांवर कारवाई कडक; दंड फक्त 114 रुपये!
SHARES

मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात महापालिकेच्या वतीने धडक मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येत आहे. पण या कारवाईमध्ये जुलै महिन्यातच तब्बल 25 हजार अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतरही अवघ्या काही मिनिटांतच पुन्हा फेरीवाल्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडले असून महापालिकेच्या कारवाईचा कोणताही प्रभाव फेरीवाल्यांवर होताना दिसत नाही. महापालिकेच्या वतीने या फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईत वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम विचारात घेता प्रत्येक फेरीवाल्यांकडून सरासरी 114 रुपयेच दंड वसूल केला जात आहे. त्यामुळेच फेरीवाल्यांवर कारवाईची दहशत नसून दंडाची आणि कारवाईची तीव्रता वाढवण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


कारवाई करूनही दंड 114च!

संपूर्ण मुंबईत 1 जुलै ते 31 जुलै 2017 या एका महिन्यात तब्बल 24 हजार 894 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 2 कोटी 35 लाख 61 हजार 473 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. याच कारवाईपोटी आणि लिलावातून एकूण 28 लाख 34 हजार 527 एवढ्या रकमेचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिकेच्या परवाना विभागाचे अधिक्षक शरद बांडे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई आणि त्यांच्याकडून वसूल केलेला दंड पाहता एका फेरीवाल्याकडून सरासरी 114 रुपये एवढाच दंड वसूल केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे 'दंड भरतो ना, मग धंदा करू द्या' असाच काहीसा भाव फेरीवाल्यांचा दिसत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाई ही सूडबुद्धीने होत असून आधी त्यांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबाजवणी करावी. पकडून नेलेला माल कसाही दंड आकारत सोडवला जातो. त्यामुळे एक प्रकारे लूट केली जात असून या अन्यायाविरोधात 26 ऑगस्ट पासून न्यायरथ यात्रा भाईंदरपासून सुरु होईल. 13 ऑगस्टला हा रथ आझाद मैदानात धडकेल.

दयाशंकर, अध्यक्ष, आझाद हॉकर्स युनियन


राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी नाहीच

मुंबईतील फेरीवाल्यांचे योग्य प्रकारे नियोजन करून त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण याची अंमलबजावणी अद्यापही करता आलेली नाही. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रभागवार समित्या स्थापन करण्यात येत आहेत. परंतु, फेरीवाल्यांचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याकडे अतिक्रमण विभाग दिल्यानंतर त्यांनी उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) रणजीत ढाकणे यांच्या मागदर्शनाखाली फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक कडक केली आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाई कडक करण्यात आली असून, भविष्यात अजून कडक कारवाई करण्यात येईल.

रणजीत ढाकणे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग


हातगाड्या, सिलेंडरवर कारवाई

जुलै महिन्यातील केलेल्या 24 हजार 894 अनधिकृत विक्रेत्यांवरील कारवाईत 1150 हातगाड्या, 841 सिलिंडर्स, 62 टेबल स्टॉल्स आणि 13 उसाचे चरक जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 6 हजार 140 नाशवंत पदार्थ विक्रेते, 7 हजार 393 अनाशवंत पदार्थ विक्रेते, 9 हजार 295 अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


दादरमध्ये सर्वाधिक फेरीवाल्यांवर कारवाई

जुलै महिन्यात केलेल्या या कारवाईत 'जी उत्तर' विभागात अर्थात दादर-माहीम परिसरात तब्बल 3 हजार 250 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. एका महिन्यात 325 हजार फेरीवाल्यांवर कारवाई करूनही दादर पश्चिम भागातील रेल्वे स्थानकाशेजारील परिसरात आजही पदपथ आणि रस्ता अडवून एकमेकांना खेटून बसत फेरीचा धंदा सुरु आहे. या खालोखाल नरिमन पॉईंट-फोर्ट 1 हजार 654, अंधेरी-जोगेश्वरी पूर्व भागात 1560 एवढ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.



हेही वाचा - 

पश्चिम रेल्वे होणार फेरीवाला मुक्त

मिठीला फेरीवाल्यांचा विळखा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा