Advertisement

राणीबागेतील पिंजऱ्याच्या बांधकामासाठी वादग्रस्त ‘हायवे’ कंपनीचं सिलेक्शन


राणीबागेतील पिंजऱ्याच्या बांधकामासाठी वादग्रस्त ‘हायवे’ कंपनीचं सिलेक्शन
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यांच्या बांधकामातील अडथळा आता दूर झाला आहे. या पिंजऱ्यांचं बांधकाम करण्याचं कंत्राट पेंग्विन पक्ष्यांचा पिंजरा उभारणाऱ्या वादग्रस्त 'मेसर्स हाय-वे कन्स्ट्रक्शन' कंपनीला देण्यात आलं आहे. या कंपनीनं अनुभवाची चुकीची कागदपत्रं सादर करून यापूर्वीही काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच अनुभवाच्या जोरावर ही कंपनी पुन्हा पिंजऱ्यांच्या बांधकामांसाठी पात्र ठरली अाहे. आजवर तब्बल वर्षभर हा प्रस्ताव रोखल्यानंतरही आयुक्तांनी मात्र हा प्रस्ताव रेटत पिंजऱ्यांचं बांधकाम हायवे कंपनीच करणार, हे जाहीर करून टाकलं.


बीएमसीनं हाती घेतलं काम

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग) नुतनीकरणाचं काम महापालिकेच्यावतीनं हाती घेण्यात आलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वाराजवळील भागाच्या सुशोभिकरणासह पेग्विनचा पिंजरा बनवण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर आता राणीबागेत येणाऱ्या नवीन येणाऱ्या तसेच विद्यमान लांडगा, अस्वल, कोल्हा, मद्रास तलाव कासव, पाणमांजर, तरस, बिबट्या, लहान मांजर संकुल, पक्षी आदींकरता पारदर्शक असणारे आणि त्यांना वातावरण अनुकूल असणारे पिंजरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


बोगस प्रमाणपत्र सादर?

यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदांमधील अटींबाबत तीव्र रान उठल्यानंतरही या निविदांमध्ये पेंग्विन पक्ष्यांचे पिंजरे उभारणाऱ्या कंत्राटदार कंपनीला पुन्हा काम मिळाले. या कंपनीने बोगस प्रमाणपत्रे सादर करून काम मिळवले असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर याची चौकशी करून काही दंडात्मक कारवाईही महापालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे या हायवे कंपनीला रोखण्याचा सर्वांनी तीव्र विरोध केल्यांनतरही प्रशासनानं या कंपनीलाच पात्र ठरवत काम बहाल केलं आहे.


७६.३४ कोटींचं कंत्राट

पिंजरे उभारण्यासाठी या कंपनीला आता ७६.३४ कोटींचं कंत्राट देण्यात येत असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. 'हाय वे' या कंपनीनं पेंग्विन पक्ष्याच्या पिंजऱ्याचं काम चांगल्याप्रकारे केल्याच्या पूर्वानुभावाच्या जोरावरच त्यांना राणीबागेतील अन्य पिंजऱ्यांच्या कामांसाठी पात्र ठरवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


या प्राण्यांसाठी बांधणार पिंजरे

लांडगा, अस्वल, कोल्हा, मद्रास तलाव कासव, पाणमांजर, तरस, बिबट्या, लहान मांजर संकुल, पक्षी पिंजरा १, आणि सरपटणारे प्राणी आदींकरता पिंजऱ्यांसाठी प्रदर्शनी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.


कंत्राटदाराची कामं

  • रात्रीकरिता प्राण्यांसाठी निवासस्थानं
  • प्राण्यांसाठी कसरतींचं आवार बांधणं
  • प्राणी पाहण्यासाठी गॅलरी बांधणं
  • प्रदर्शनी गॅलरीसाठी अॅक्रेलिक ग्लास बसवणं
  • प्राण्यांसाठी कृत्रिम तलाव, जलाशय बांधणं
  • पक्षी ठेवण्यासाठी दोरखंडांच्या जाळींचं कुंपण


असं असेल पिंजऱ्याचं बांधकाम

विविध प्राण्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थांनासाठी प्रदर्शनीय गॅलरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बिबट्याचा पिंजरा आणि लहान मांजरींसाठी संकुलात तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाच्या जाळीचं कुंपण बसवण्यात येणार आहे. याशिवाय अॅक्रेलिक ग्लास, जीवन समर्थन प्रणाली आणि कृत्रिम दगड आदींचा समावेश आहे.


हेही वाचा -

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी

राणीबागेत येणार गुजरातच्या सिंहाचं राज!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा