Advertisement

मुंबईतील 147 ‘गार्बेज व्हल्नरेबल’ ठिकाणांवर BMCची कारवाई

CCTV, दंड आणि विशेष स्वच्छता मोहिम राबवणार

मुंबईतील 147 ‘गार्बेज व्हल्नरेबल’ ठिकाणांवर BMCची कारवाई
SHARES

मुंबईतील सतत कचरा साचणाऱ्या ठिकाणांवर आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठी मोहीम हाती घेतली आहे.

मुंबईतील 26 विभागांमध्ये एकूण 147 ‘गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स’ची ओळख पटवून त्यांच्यासाठी विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी वाढीव कचरा संकलन, CCTV निगराणी, दंडात्मक कारवाई आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, एम/पश्चिम विभागात सर्वाधिक 37 ठिकाणांची नोंद झाली आहे. यात चेंबूरमधील चेडा नगर, टिळक नगर आणि परिसराचा समावेश आहे. त्यापाठोपाठ पी/उत्तर विभागातील मालाड आणि मालवणी भागात 12 ठिकाणे आहेत. जी/उत्तर विभागातील दादर, धारावी तसेच एन विभागातील घाटकोपरमध्ये प्रत्येकी 10 ठिकाणे आढळली आहेत. एम/पूर्व विभागातील देवनार आणि मानखुर्द तसेच एफ/उत्तर विभागातील माटुंगा, सायन आणि वडाळा भागात प्रत्येकी 9 ठिकाणे नोंदवण्यात आली आहेत.

दररोज मुंबईत निर्माण होणाऱ्या 6,300 ते 6,500 मेट्रिक टन घनकचऱ्यापैकी मोठ्या प्रमाणातील कचरा या संवेदनशील ठिकाणांवरून उचलला जातो. ही ठिकाणे प्रामुख्याने गर्दीची क्षेत्रे किंवा दाट झोपडवस्ती भागांमध्ये आहेत, जिथे कचरा संकलन वाहनांना पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे ही ठिकाणे सतत अनियंत्रित कचरा साचण्याची केंद्रे बनली असून स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी BMCने विभागस्तरीय कर्मचाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली आहे. प्रत्येक ठिकाणाचे मॅपिंग करून कचरा साचण्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार असून अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच पुन्हा कचरा साचू नये यासाठी CCTV कॅमेरे बसवले जाणार असून कचरा संकलन सेवाही वाढवण्यात येणार आहेत.



हेही वाचा

1 जूनपासून बसस्थानकांवर मोफत स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा