रहिवासी वाहनतळ ऐच्छिक

Mumbai
रहिवासी वाहनतळ ऐच्छिक
रहिवासी वाहनतळ ऐच्छिक
रहिवासी वाहनतळ ऐच्छिक
See all
मुंबई  -  

दक्षिण मुंबईमध्ये असणारी वाहनांची लक्षणीय संख्या, तसेच याच भागात बाहेरून कामानिमित्त येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. यामुळे अनेकदा या भागातील रहिवाशांना आपली लाखो रुपये किंमतीची वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी किंमती गाड्या रस्त्यांवर उभ्या कराव्या लागत आहे.

आजच्या धावपळीच्या जगात महत्त्वाची असणारी वाहने ठेवण्यासाठी सुनिश्चित व आरक्षित जागा असणे ही गरजेची बाब झाली आहे. या बाबी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेद्वारे ‘ए’ विभागातील रहिवाशांसाठी ‘रहिवासी वाहनतळ योजना’ ही ऐच्छिक स्वरुपातील योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना ‘ए’ विभागात यशस्वी ठरल्यानंतर महापालिकेच्या इतर प्रशासकीय विभागांमध्येही राबविण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रहिवाशी वाहनतळ योजना ही सध्या केवळ ‘ए’ विभागात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रहिवाशांना त्यांची इमारत ज्या रस्त्यावर आहे, केवळ त्याच रस्त्यावरील काही भाग आरक्षित करवून घेणे शक्य होणार आहे. ज्यामुळे या रहिवाशांना रात्रभरासाठी त्यांची वाहने ठेवण्यासाठी निश्चित व आरक्षित जागा वर्षभरासाठी मिळणार आहे. ही योजना ऐच्छिक स्वरुपाची असल्याने जे रहिवाशी आपल्या सहकारी गृहरचना संस्थेमार्फत अर्ज करतील, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

वाहतूक पोलिसांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्यानंतर इमारतीच्या जवळील रहिवाशी वाहतनळासाठी अपेक्षित असलेला सदर रस्ता ज्या वर्गवारीमध्ये असेल त्या वर्गवारीनुसार गणना करून येणारे एका वर्षासाठीचे शुल्क भरण्याबाबत महापालिका संबंधित अर्जदारास सूचित करेल. याबाबतची माहिती अर्जदारास विभाग कार्यालयाद्वारे दिली जाईल. या जागी अर्जदाराला त्याचे वाहन साधारणपणे रात्री 8 ते सकाळी 8 या कालावधी दरम्यान उभे करता येणार आहे. तसेच या कालावधी दरम्यान संबंधित इमारतीच्या सुरक्षारक्षकांमार्फत जागेवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असणार आहे. ‘रहिवासी वाहनतळ योजना’ ही ऐच्छिक स्वरुपाची असून, स्थानिक रहिवाशांना त्यांची वाहने उभी करण्याची निश्चित अशी सोय व्हावी यादृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. तसेच सदर योजना सरसकट सर्व रस्त्यांना लागू असणार नाही,असे महापालिका रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले.

पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोफत कारपार्किंग

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जागतिक वारसा स्थळांसह अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईचे जागतिक पर्यटन नकाशावरील असणारे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन महापालिकेचे सुधारित वाहनतळ धोरणामध्ये विविध पर्यटनपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (Bank Holidays) वाहनतळ शुल्कामध्ये 50 टक्के सूट तसेच पर्यटन स्थळांजवळील निश्चित करण्यात आलेल्या वाहनतळांवर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोफत पार्किग आदी सुविधांचा समावेश आहे. मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इत्यादी पर्यटनस्थळांच्या जवळ असणाऱ्या व निश्चित करण्यात आलेल्या वा करण्यात येणाऱ्या वाहनतळांवर सुट्टीच्या दिवशी मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण देखील महापालिकेने स्वीकारले आहे.
महापालिकेच्या सुधारित वाहनतळ धोरणांमध्ये पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना अतिरिक्त सुविधा देण्याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये सशुल्क सार्वजनिक वाहनतळांच्या जागी रविवारी आणि बँकेच्या सुट्टीच्या दिवशी वाहन उभे करण्याच्या शुल्कात 50 टक्के सूट देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.