Advertisement

महापालिकेच्या ‘त्या’ फायलींचे झाले काय? चौकशीचे आदेश

स्टॉक होर्डिंग कॉर्पोरेशनच्या महापे येथील गोदामाला लागलेल्या आगीनंतर महापालिकेची कागदपत्रे सुरक्षित आहेत का? असा सवाल सपाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. म्हाडा, एमएमआरडीएसह एलआयसीनेही आपल्या कागदपत्रांच्या फायली या आगीत जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. मग महापालिकेच्या कागदपत्रांच्या फायलींचे झाले काय? असा सवाल व्यक्त करत शेख यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या ‘त्या’ फायलींचे झाले काय? चौकशीचे आदेश
SHARES

मुंबई महापालिकेसह एमएमआरडीए, म्हाडा तसेच एलआयसी आदींची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यात येत असलेल्या स्टॉक होर्डिंग कॉर्पोरेशनच्या महापे येथील गोदामाला लागलेल्या आगीनंतर महापालिकेची कागदपत्रे सुरक्षित आहेत का? असा सवाल सपाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. म्हाडा, एमएमआरडीएसह एलआयसीनेही आपल्या कागदपत्रांच्या फायली या आगीत जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. मग महापालिकेच्या कागदपत्रांच्या फायलींचे झाले काय? असा सवाल व्यक्त करत शेख यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


१२ लाख पानांचे स्कॅनिंग!

महापालिकेकडून सन २०१२-१३मध्ये स्टॉक होर्डिंग कॉर्पोरेशन या कंपनीला सुमारे १२ लाख पानांचे व्हॉल्युमचे स्कॅनिंग करून त्यांचे दस्तऐवज महापे येथील त्यांच्या गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्याचे कंत्राट दिले होते. त्यानुसार या कंपनीने सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून लॉकर्समध्ये ठेवले होते. या फाईल्स सांभाळण्यासाठी कंपनीला महापालिकेने कंत्राट दिले होते.


आगीत फायली जळाल्या?

ज्या जागेत महापालिकेचा हा जुना दस्तऐवज ठेवण्यात आला होता, तिथेच डिसेंबर २०१७मध्ये आग लागली होती. ही आग सलग दोन दिवस सुरु होती. या आगीमध्ये म्हाडाच्या फायली जळून खाक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमएमआरडीएनेही आपल्या फायली जळाल्याचे म्हटले आहे, मग महापालिकेच्या फायलींचे झाले काय? असा सवाल रईस शेख यांनी केला आहे.


क्लाऊड असताना कोट्यवधींची उधळपट्टी का?

जतन करायला दिलेल्या फायली सुरक्षित आहे की जळाल्या आहेत याची माहिती प्रशासनाने द्यावी. तसेच आता क्लाऊडची व्यवस्था असल्यामुळे अशाप्रकारे कागदपत्रे जतन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च का केले जात आहेत? असाही सवाल त्यांनी केला.


स्थायी समितीचे चौकशीचे आदेश

यावर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी पाठिंबा देताना आमदार अमित साटम जे आरोप करत आहेत, ते याच फायली असल्याचे सांगत याची सर्व माहिती समोर यायला हवी असे सांगितले. त्यामुळे जे कंत्राट दिले आहे ते रद्द करून महापालिकेच्या ताब्यात या फायली परत घेतल्या जाव्यात, अशी सूचना केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रईस शेख यांचा हरकतीचा मुद्दा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे प्रशासनाने याची चौकशी करून याबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश दिले आहेत.



हेही वाचा

‘शील’मध्येही म्हाडाच्या फायली असुरक्षित! १८ हजार फायली जळून खाक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा