काटकसरी नावाखाली कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा?

 Mumbai
काटकसरी नावाखाली कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा?

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आस्थापना विभागांवर होणाऱ्या खर्चालाच महापालिका आयुक्तांकडून कात्री लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. महापालिकेच्या मानव संसाधन विभागाचे सुसूत्रीकरण आणि आधुनिकीकरण करताना वेगवेगळया श्रेणीतील पदेच रद्द करण्यात येणार असल्याचे सांगत काही ठिकाणी कामगारांच्या पदांमध्ये कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अशाप्रकारे दैनंदिन कामकाजाच्या खर्चात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची बचतच महापालिका प्रशासनाने करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतील अवास्तव आणि अनाठायी खर्चांना चाप लावत काटकसरीचा मार्ग अवलंबणाऱ्या महापालिका प्रशासनाने लघुलेखक, लिपिक, दूरध्वनी चालक इत्यादी श्रेणीतील पदे रद्द करून ही सर्व कामं कार्यकारी सहाय्यक या एकाच पदामार्फत पार पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जलअभियंता खात्यामध्ये वाहनचालक, कामगार आणि चावीवाला ही पदे वेगवेगळी असणार नाहीत, असे जाहीर करत चावीवाल्याला साधनसामुग्रीसह वाहन दिले जाईल. तो वाहनही चालवेल आणि व्हॉल्व्ह ऑपरेट करेल. येत्या वर्षात या सुधारणांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्याचा मानस असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या अतिकालीन भत्यावर (ओव्हरटाईम ) पूर्वीच निर्बंध घालण्यात आले आहेत. जिथे जिथे शक्य आहे, तिथे आऊटसोर्सिंगद्वारे काम करून घेण्याची शक्यता आजमावण्यात येत आहे. त्याप्रमाणे दैनंदिन खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चात 2 हजार 525 कोटी इतकी कपात झाल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या भ्रमणध्वनी आणि निवासी दूरध्वनीच्या सुविधेवरील खर्चाचे देयक सादर केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष खर्चाची रक्कम देण्यात येते. परंतु ही पद्धत आता खंडित करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2016पासून याकरता अधिकाऱ्यांना ठोक रकमेचे अधिदान करण्यात येत आहे. यामुळेही प्रशासकीय खर्चात बचत झाली आहे. याशिवाय ‘शिक्षण भत्ता’ अधिदानाची कार्यपद्धतीही सुलभ केली आहे.

Loading Comments