Advertisement

बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर


बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर
SHARES

मुंबई - शिवाजी पार्कमधील महापौर निवासाची जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मारकासाठी देण्याचा निर्णय अखेर मुंबई महापालिका सभागृहात घेण्यात आला. भाजपाविना आणि कोणत्याही चर्चेविना महापौर निवासाची जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्मारकासाठी जागा देण्याचे सर्व सोपस्कार पार पडले असून आता स्मारकाच्या आराखड्यानुसार अंतर्गत बदल करण्यासाठी हेरिटेजच्या मान्यतेनंतरच स्मारक पूर्णत्त्वास येणार आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला महापौर निवासाची जागा देण्याचा प्रस्ताव 11 जानेवारीला सुधार समितीत मंजूर करण्यात आला. परंतु ऐनवेळी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा प्रस्ताव सभागृहात अडकून पडला होता. परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्याच महापालिका सभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता कोणत्याही चर्चेविना त्याला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे या सभागृहात भाजपाचा एकही सदस्य हजर नव्हता. भाजपा नगरसेवकांच्या गैरहजेरीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 30 वर्षाकरता वार्षिक एक रुपया या नाममात्र दराने ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर निवास हे सीआरझेड-टूमध्ये मोडत असून यासाठी 11,551 चौरस मीटर एवढी जागा दिला जाणार आहे. महापौर निवासाची जागा देण्यात आल्यामुळे आता विद्यमान महापौरांना आपला मुक्काम हलवावा लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून खुद्द खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू आदींनी महापालिकेत ठाण मांडलं होतं. हा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आल्यामुळे ही जागा स्मारकासाठी देण्याचे मंजुरीचे सोपस्कार पार पडले. आता केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, भाडेतत्वावर ही जागा दिल्यानंतर न्यासाला जर यामध्ये कोणतेही काम करायचे असल्यास मालमत्ता विभाग आणि हेरीटेज समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा