Advertisement

BMC Budget : महापालिका सादर करणार अर्थसंकल्प

मुंबई महापालिका बुधवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प हा खर्चिक ठरणार असल्याची शक्यता आहे.

BMC Budget : महापालिका सादर करणार अर्थसंकल्प
SHARES

मुंबई महापालिका बुधवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प हा खर्चिक ठरणार असल्याची शक्यता आहे. कारण एकीकडं कोविड खर्चाचा भार, तर दुसरीकडे उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळं महापालिकेसाठी आगामी आर्थिक वर्ष नाजूक ठरणार आहे. त्यामुळं कर्जरोखे उभारणं, सुधारित मालमत्ता कर, गलिच्छ वस्ती सुधारणा सेवा शुल्क असं उत्पन्नाचे विविध स्रोत विकसित करण्यासाठी महापालिकेची चाचपणी सुरू आहे.

२०२२मध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्यानं सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात करवाढ नसलेला व विकासकामांसाठी भरीव तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर करण्याचं आव्हान प्रशासनापुढं आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणार असल्याने आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढली आहे.

निवडणुकीआधीचा हा अर्थसंकल्प असल्यानं विकासकामांसाठी भरीव निधी मिळावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणारा हा अर्थसंकल्प आयुक्त बुधवारी स्थायी समितीला सादर करणार आहेत. मात्र विद्यमान आर्थिक वर्षात निश्चित केलेल्या २८,४४८ कोटी उत्पन्नापैकी डिसेंबरअखेरपर्यंत ११,६१६ कोटी महसूल जमा झाला आहे.

यामध्ये जकातीपाती मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा वाटा अधिक असून, सप्टेंबर २०२१पासून हा निधीदेखील बंद होणारा आहे. अशा नाजूक परिस्थितीत आगामी अर्थसंकल्प मुंबईकरांवर कोणताही भार न टाकता विकास साधणार का, याकडे आता  सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. विद्यमान आर्थिक वर्षात मुंबई पूरमुक्त, आपत्तीमुक्त आणि आनंदी करण्याचे लक्ष्य महापालिकेनं ठेवलं. मात्र मार्चमध्ये मुंबईत कोरोनानं शिरकाव केल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याचा फटका अनेक योजनांना बसला. त्यामुळं ५२ टक्के निधी अद्याप खर्च झालेला नाही.

आगामी अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी मोठी तरतूद असेल. सुरक्षित मुंबईसाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करणे, मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवणे, मिठी नदीचे सौंदर्यीकरण-बोटिंग, नद्यांचे पुनरुज्जीवन, फ्लड गेट वाढवणे यासह दर्जेदार सिमेंटचे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

याकरीता तरतूद अपेक्षित

  • कोरोनातून धडा घेऊन आरोग्य सुविधांसाठी जादा निधी, साथजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये.
  • अतिवृष्टीत पावसाचे पाणी साचवण्यासाठी भूमिगत टाक्या.
  • सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या नव्या शाळा.
  • उत्पन्नवाढीसाठी नव्या उपाययोजना.



हेही वाचा -

कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी

लोकल सुरू झाल्यानं महापालिकेची यंत्रणा सतर्क


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा