मेट्रो रेल्वेच्या कारशेडचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला

  BMC
  मेट्रो रेल्वेच्या कारशेडचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला
  मुंबई  -  

  आरे कॉलनीतील जागेवर मेट्रो रेल्वेच्या कारशेडचे आरक्षण टाकण्याचा सरकारचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला आहे. याआधी सुधार समितीच्या बैठकीतही हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता.

  आरेतील मेट्रो रेल्वेच्या कारशेडला शिवसेनेने जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मे महिन्यात सुधार समितीच्या बैठकीत सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मेट्रो कारशेडच्या आरक्षणाचा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी गनिमी काव्याने नामंजूर केला होता. हा प्रस्ताव नामंजूर झाल्यामुळे भाजपाने याचा तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सभागृहात भाजपा आपली भूमिका मांडून कशा प्रकारे हा प्रस्ताव मंजूर करुन घेते याकडे सर्वांचे लक्ष होते.

  विरोधाविना प्रस्ताव दप्तरी दाखल

  जोगेश्वरी-गोरेगाव पूर्वेकडील प्रजापूर व वेरावली येथील आरे दुग्धशाळेच्या 33 हेक्टर जागेवर मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे. ही जागा 'ना विकास क्षेत्रा'तून वगळून त्यावर मेट्रो कार डेपो, वर्कशॉप तसेच वाणिज्य वापरासाठी आरक्षण टाकण्याचा हा प्रस्ताव सुधार समितीने नामंजूर केल्यानंतर गुरुवारी समिती अध्यक्ष बाळा नर यांनी सर्वसाधारण सभेत मांडला. परंतु, हा विषय भाजपा सदस्यांच्या लक्षातच आला नाही. त्यामुळे कोणत्याही विरोधाविना हा प्रस्ताव महापौरांनी मंजूर करत सुधार समितीने घेतलेल्या नामंजुरीच्या निर्णयाला मंजुरी देत दप्तरी दाखल केला.


  महापालिका सभेत भाजपा गप्प का?

  सुधार समितीत बोलू दिले नाही म्हणून आरडाओरड व सभात्याग करणारे तसेच स्वत:ला पहारेकरी म्हणवणारे भाजपाचे सदस्य आता गप्प का राहिले? असा सवाल सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी केला. सुधार समितीत त्यांना बोलता आले नाही. पण महापालिकेत त्यांना आपली बाजू मांडता आली असती. पण त्यांचे कामकाजाकडे लक्षच नसून पहारेकरी हे 'जागते रहो'ऐवजी झोपाच काढत असल्याची टीका नर यांनी केली.


  विरोध करुन काय होणार?

  सुधार समितीत हा प्रस्ताव नामंजूर करुन शिवसेनेने आपण विकासाविरोधात असल्याचे दाखवून दिले. सुधार समितीत त्यांनी प्रस्ताव नामंजूर केला होता. त्यांना चर्चा करण्याची भीती वाटते. हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असला, तरी सरकारने आपल्या अधिकारात काम सुरु केले. अधिकार आहेत. मेट्रोचे कारशेड होणारच आणि मेट्रोचे काम होणार, असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.