Advertisement

महापालिकेचे विद्यार्थी घेणार कंत्राटदारांची 'परीक्षा'

शाळेतील ७० टक्के विद्यार्थ्यांनी कंत्राटदाराने चांगली स्वच्छता केली आहे किंवा सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे, असं अनुकूल मत दिल्यावरच संबंधित कंत्राटदाराला त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात येणार आहे.

महापालिकेचे विद्यार्थी घेणार कंत्राटदारांची 'परीक्षा'
SHARES

मुंबई महापालिकेने कंत्राटदारांची 'परीक्षा' घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली असून विद्यार्थ्यांनी अनुकूल मत दिल्यावरच या कंत्राटदारांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत उत्तीण होण्यासाठी यापुढे कंत्राटदारांना चांगलीच मेहनत करावी लागेल, असं दिसत आहे.


काय आहे निर्णय?

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या इमारतींची स्वच्छता आणि सुरक्षा करण्याचं कंत्राट ३ वर्षांसाठी देण्यात आलं आहे. एकूण ३३६ ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. नेमलेल्या कंत्राटदारांना या कामाचा मोबादला मासिक पद्धतीने कुठल्याही सर्वेक्षणाशिवाय देण्यात येतो.


७० टक्के विद्यार्थ्यांचं मत

परंतु यापुढे तसं होणार नाही. तर शाळेतील ७० टक्के विद्यार्थ्यांनी कंत्राटदाराने चांगली स्वच्छता केली आहे किंवा सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे, असं अनुकूल मत दिल्यावरच संबंधित कंत्राटदाराला त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात येणार आहे. यासंबंधिचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. कामाची गुणवत्ता सुधारावी आणि कामकाज विद्यार्थीस्नेही असावं हा यामागचा उद्देश आहे.



३ संस्थांना कंत्राट

शिक्षण विभागाच्या इमारतींची स्वच्छता आणि सुरक्षेचं कंत्राट ३ संस्थांना नेमून देण्यात आलं आहे. त्यानुसार शहर भागातील कंत्राटदार संस्थेकडे ९२ इमारतींच्या स्वच्छता आणि सुरक्षेची जबाबदारी आहे. तर पूर्व उपनगरातील १२० आणि पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींच्या स्वच्छता आणि सुरक्षेची जबाबदारी इतर २ संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. ही नेमणूक १८ मार्च २०१६ ते १७ मार्च २०१९ कालावधीसाठी राहणार आहे.


'अशी' होणार मतनोंदणी

महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या देण्यात येतील. या चिठ्ठ्यांवर विद्यार्थी शाळेत स्वच्छतेचं काम चांगलं झालं असल्यास 'होय' आणि स्वच्छता चांगली झाली नसल्यास 'नाही' असं लिहितील. एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांनी 'होय' असं उत्तर दिलं असेल, तरच कंत्राटदाराला मानधन देण्यात येईल, अन्यथा नाही.


कधीपासून सुरूवात?

या नवीन कार्यपद्धतीची सुरूवात जून २०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नोंदवूनच कंत्राटदाराला मोबदला देण्याचे निर्देश सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना दिल्याचं शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी सांगितलं.



हेही वाचा-

स्वच्छ सर्वेक्षण 2018 : मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी!

घाटकोपरच्या वल्लभबाग नाल्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा