Advertisement

'असं' भंगलं महापालिकेचं ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचं स्वप्न!

मीनाताई ठाकरे मंडईतील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यात येणार होता. परंतु या प्रकल्पासाठी आवश्यक मलनि:सारण प्रकल्पाची जागाच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे महापालिकेवर हा प्रकल्पच गुंडाळण्याची नामुष्की आली.

'असं' भंगलं महापालिकेचं ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचं स्वप्न!
SHARES

मुंबईत ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्याचं मुंबई महापालिकेचं स्वप्न साकारण्यापूर्वीच भंगलं आहे. दादर येथील दि. मीनाताई ठाकरे मंडईतील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यात येणार होता. परंतु या प्रकल्पासाठी आवश्यक मलनि:सारण प्रकल्पाची जागाच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे महापालिकेवर हा प्रकल्पच गुंडाळण्याची नामुष्की आली आहे.


कुठं साकारणार होता प्रकल्प?

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे दादर येथील मीनाताई ठाकरे फूल मंडईत तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून फूल मंडईच्या पाठीमागील मलनि:सारण प्रचालन खात्याच्या जागेत सुमारे ८०० युनिट प्रतिदिन वीज निर्मिती करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज दि. प्रमोद महाजन उद्यान, फूल मंडई, मासळी बाजार, दादर यानगृह व दादर मलप्रक्रिया केंद्र इथं पुरवण्यात येणार होती.


जागा देण्यास नकार

मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा मलनि:सारण प्रचालन विभागानं देण्यास नकार दिला. त्यामुळेच हा प्रकल्प आता कुठे करायचा? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. यासाठी आता पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. हा प्रकल्प साकारला असता तर दररोज १० टन ओल्या कचऱ्यांची विल्हेवाट लावता आली असती.


फायदा काय झाला असता?

शिवाय त्यापासून अपारंपारिक वीज निर्मिती करणं शक्य झालं असतं. एवढंच नव्हे, तर यामुळे कचरा वाहतूक, कचरा भराव भूमीवरील प्रक्रिया इत्यादींमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत झाली असती. या प्रकल्पांतर्गत निर्माण झालेली वीज महापालिकेच्या कार्यालयांमध्ये वापरली जाणार असल्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चातही बचत झाली असती.


पर्यायी जागेचा शोध

यासंदर्भात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा प्रकल्प फूल मंडईच्या मागील बाजूस मलनि:सारण प्रचालन खात्याच्या जागेत करण्याचं निश्चित केलं होतं. परंतु ही जागा भविष्यात मलनि:सारण खात्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर कोणताही प्रकल्प केला जावू नये, असं या खात्याचं म्हणणं असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा प्रकल्प याठिकाणी केला जाणार नाही. मात्र, या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा शोध असून जागा उपलब्ध झाल्यानंतर या प्रकल्पाचा विचार केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

मंडईतच होणार कचऱ्यावर प्रक्रिया

मध्य वैतरणातील वीजनिर्मिती प्रकल्पाचे ५१ कोटी रुपये पाण्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा