Advertisement

दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधात कारवाई

सोमवारी महापालिकेकडून दादरच्या फूल व भाजी बाजारात मोठी कारवाई करण्यात आली. फुलांचे व भाज्यांचे वाटे प्लास्टिकच्या पिशवीतून विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधात कारवाई
SHARES

पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी व प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मुंबईत २०१८ मध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली. मात्र, योग्य नियोजन नसल्यामुळं फेरीवाले व काही दुकानदार सहज प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत होते. परंतु, आता प्लास्टिकचा वापर केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, सोमवारी महापालिकेकडून दादरच्या फूल व भाजी बाजारात मोठी कारवाई करण्यात आली. फुलांचे व भाज्यांचे वाटे प्लास्टिकच्या पिशवीतून विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तसंच, ग्राहकांकडूनही पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीला आक्रमक पवित्रा दाखवून नंतर थंड पडलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने आता प्लास्टिक विरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर १ मार्चपासून कडक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. २ वर्षांपूर्वी गुढीपाडव्यापासून राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आणि २३ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

परंतु, गेल्या काही महिन्यात ही कारवाई थंड पडली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी कारवाई तीव्र करण्याचे निर्देश सर्वाना दिले असून मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, सोमवारी पालिकेने दादरच्या फूल व भाजी बाजारात मोठी कारवाई केली.

दादरच्या फूल व भाजी बाजारात (Dadar Flower and Vegetable Market) मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असतात. ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फुले प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांमधून सर्रास दिल्या जातात. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर तसंच, केवळ दादरमधून कारवाई करत ३१५ फेरीवाल्यांकडून व ४५० फूल विक्रेत्यांकडून साडेचौदा किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणं, १५ दुकानदारांक डून प्लास्टिक जप्त करून त्यांच्याकडून ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

दादरच्या बाजारात येणाऱ्या ग्राहकांकडील प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या. मात्र, ग्राहकांकडून कोणताही दंड वसूल करण्यात आला नसल्याची माहिती मिळते. महापालिकेनं (BMC) मुंबईत सोमवारी विविध ठिकाणी कारवाई करून १ हजार किलो प्लास्टिक जप्त केले, तर पावणेचार लाखाचा दंड वसूल केला.

बंदी असलेले प्लास्टिक

  • प्लास्टिक पिशव्या
  • प्लास्टिकचे एकवापर साहित्य (ताट, कप, प्लेटस, ग्लास, चमचे इत्यादी)
  • हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक डबे
  • प्लास्टिकचे वेष्टण

दंडाची तरतूद

  • प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये
  • दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये
  • तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांची कैदहेही वाचा -

Best Of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १०वीची परीक्षा

सीएसएमटी स्थानकात लोकल धडकली बफरलासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा