SHARE

क्रॉफर्ड मार्केटमध्ये जवळपास 50 ते 60 वर्षांपासून पाळीव प्राणी आणि पक्षी यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना आता अधिकृत परवाना देण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. याला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील प्राणी आणि पक्षी विक्रीवर प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावेळी क्रॉफर्ड मार्केटमध्ये अशा प्रकारे अनधिकृतरित्या पशू-पक्ष्यांची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पालिकेकडून परवाने वाटप करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे पुन्हा एकदा ही विक्री सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


हेही वाचा

परवान्याशिवाय पाळीव प्राणी,पक्षी विकण्यास बंदी

'मुंबईतील बेकायदेशीर पशु-पक्ष्यांची विक्री बंद करा'


क्रॉफर्ड मार्केटमध्ये 1 हजार 100 अधिकृत परवानाधारक दुकानदार आहेत. या दुकानदारांना महापालिका अधिनियम 1188 च्या कलम 401 आणि 479 अंतर्गत बाजार विभागाने परवाने दिले आहेत. मंडईत उपलब्ध असलेल्या नोंदवहीनुसार 1958 - 59 पासून पशू-पक्ष्यांची विक्री केली जाते. यात पाळीव कुत्र्यांसह, मांजर, ससा, उंदीर, बदक, कासव, शोभिवंत किंवा विविध जातींचे पक्षी आणि प्राणी आदींची विक्री होत असली तरी, त्यांच्याकडे विक्रीचा अधिकृत परवाना नाही. पालिकेच्या अनुसूचीमध्येही त्यांची नोंद नाही. त्यामुळे या गाळेधारकांना अधिकृत परवाना देणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पालिकेने महापालिका सभागृहात सादर केला. या प्रस्तावाला सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेली अनेक वर्ष प्राणी-पक्षी विक्री व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिल्यानंतर पक्ष्यांसह प्राणी खरेदी आणि विक्री करण्यासाठी परवाना देणे शक्य होणार आहे. दुसरीकडे इथल्या दुकानदारांवर अनधिकृतरित्या पक्षी आणि प्राणी विक्रीवर बंदी येणार असल्याचे पालिकेच्या बाजार खात्याकडून सांगण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या