Advertisement

बायोमेट्रीक हजेरी गोंधळाला आस्थापना विभाग जबाबदार

पगाराची रक्कम कापण्यात आल्याने सध्या महापालिका कामगार, अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असला आहे. ही प्रणालीच अयशस्वी ठरल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व गोंधळाला महापालिकेच्या विविध खात्यातील आस्थापना विभागाचे कर्मचारीच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.

बायोमेट्रीक हजेरी गोंधळाला आस्थापना विभाग जबाबदार
SHARES

मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्यास सुरुवात झाली खरी; पण हजेरी संगणकात अचूकपणे नोंदवण्यात न आल्याने तब्बल १७ हजार कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगारच निघाला नाही. तर २२ हजार कामगारांच्या पगाराची रक्कम कापण्यात आली. यावरून सध्या कामगार, अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असला असून ही प्रणालीच अयशस्वी ठरल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व गोंधळाला महापालिकेच्या विविध खात्यातील आस्थापना विभागाचे कर्मचारीच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.


बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक

मुंबई महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्यानंतर ही हजेरी नोंदवण्यासाठी मुख्यालयासह विविध कार्यालयांमध्ये ३९०० मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कायमस्वरुपती सेवेत असलेल्या सुमारे १ लाख २ हजारांहून अधिक विविध खात्यातील तसेच विभागांमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची या बायोमेट्रिक हजेरीवर नोंद होत आहे.


३७ हजार जाणांना फटका

बायोमेट्रिक मशिन या आधार कार्ड आणि पगाराशी जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची संगणकीय हजेरीपटावर जेवढ्या तासांची आणि दिवसांची नोंद झाली असेल तेवढाच त्यांचा पगार निघणार आहे. त्यामुळे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संगणकीय हजेरी नोंद झालेली नाही त्यांचा पगार निघालेला नाही. तर ज्यांनी पूर्ण दिवस किंवा अर्धा दिवस सुट्टी किंवा एक ते दोन तासांची सवलत घेतली असेल त्याचीही नोंद संगणकीय हजेरीत न झाल्यामुळे सुमारे ३७ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना याचा फटका बसला.


कामाच्या वेळेची नोंद नाही

बायोमेट्रिक हजेरीच्या प्रणालीचा वापर करण्यात आल्यानंतर प्रशासनाने सुमारे ७० हून अधिक बैठका घेतल्या. आतापर्यंत सुधारीत ४ ते ५ परिपत्रकं काढली. एवढंच नाही तर प्रत्येक खात्यांच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांना संगणकीय हजेरी कशाप्रकारे नोंदवली जावीत, याचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार विविध खात्यांच्या आस्थापन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंद नव्या हजेरीपटावर केली. परंतु त्यांच्या कामाच्या वेळेची नोंद केलेली नाही.


यामुळे कापले पगार

त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांनी बायोमेट्रिक मशिनवर आपली हजेरी तर नोंदवली. परंतु त्यांच्या कामाच्या वेळा आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी न नोंदवल्यामुळे काहींचे पगारच रोखून धरण्यात आले, तर काहींचे पगार कापण्यात आले आहेत.


रजांची नोंद नाही

अनेक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नैमित्तीक रजा तसेच अर्जित रजा यांची माहिती आस्थापना विभागाला दिल्यानंतरही त्यांनी याची नोंद संगणकीय हजेरीमध्ये न केल्यामुळे त्यांचे पगार कापण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच पालिकेच्या विविध खात्यातील आस्थापना विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेची नोंद संगणकीय हजेरीपटावर नोंदविली नसल्याने महिनाभर नित्यनियमाने कामावर येऊनही अनेकांना वेतनापासून वंचित राहावं लागलं.

दरम्यान, गुरुवारी केईएम रुग्णालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्या १७ हजार कर्मचाऱ्यांचे पगार रोखून धरण्यात आले, त्या सर्वांचे पगार शुक्रवारपासून त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. विविध खात्यातील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचे कर्तव्य काळ, शिल्लक रजा, हजेरीच्या वेळा, रजेच्या नोंदी याची योग्य ती माहिती अद्ययावत करून मानव संसाधन विभागाच्या इमेलवर पाठवण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुखांना, सहायक आयुक्तांना तसेच उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा-

पगार कापला! 'केईएम'च्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, रुग्ण वाऱ्यावर

बायोमेट्रिक हजेरी प्रकरण - रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा लवकरच होणार पगार!

कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सनं, मग नगरसेवकांची कधी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा