महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक एस. के. बनसोडेंची हकालपट्टी

  Mumbai
  महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक एस. के. बनसोडेंची हकालपट्टी
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापाल एस. के. बनसोडे यांना पुन्हा राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज हाताळता येत नसल्यामुळे महापालिकेने त्यांना पुन्हा मंत्रालयात पाठवून दिले आहे. बनसोडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कंत्राटदाराला निविदांची कागदपत्रे पुरवण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

  महापालिकेतील मुख्य लेखापरीक्षक  एस. के. बनसोडेंच्या सांगण्यानुसारच कुलाबा सांडपाणी प्रकल्पाच्या कंत्राटाची कागदपत्रे बाहेरच्या व्यक्तींना दाखवण्यात आली असून या व्यक्तींनी ही कागदपत्रे मोबाईलमध्ये टिपून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्य लेखापरीक्षकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार चौकशी सुरु करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांना थेट पुन्हा मंत्रालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


  प्रशासकीय कामकाज हाताळण्यात अपयशी

  प्रभारी मुख्य लेखापरिक्षक अनिल बडगुजर यांच्या जागी वर्षभरापूर्वी राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयातील अधिकारी असलेले एस. के.बनसोडे यांची प्रतिनियुक्ती झाली होती. परंतु वर्षभरातच बनसोडे यांना पुन्हा मंत्रालयात पाठवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.


  कोटकांच्या आरोपांमध्ये तथ्य

  कोटकांनी केलेल्या आरोपांनंतर सुरु असलेल्या चौकशीमध्ये बनसोडे यांनी कंत्राटदाराला मदत केल्याची बाब निदर्शनास आली. त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्य शासनाला कळवून  बनसोडे यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे कळवले आहे. त्यानुसार त्यांनी महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक या पदावरून दूर होत पुन्हा राज्य शासनामधील मूळ पदावर कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी त्याला दुजोरा दिला असून प्रशासकीय कामकाज त्यांना हाताळता येत नसल्यामुळे पुन्हा राज्य शासनाकडे पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे.


  नक्की झालं काय होतं?

  वरळी हबमधील मलनि:सारण प्रकल्प विभागात 25 मे रोजी लेखापरीक्षक विभागाच्या अधिकारी दोन व्यक्तींसह आल्या आणि त्यांनी कुलाबा मलजल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे ऑडिट करायचे असल्याचे सांगत यासंबंधातील फाईल्स दाखवायला सांगितले. त्यानुसार उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रांची फाईल सोबतच्या दोन व्यक्तींना दाखवण्यास सांगितले. परंतु, ही कागदपत्रे पाहत असतानाच त्या दोघांनी या कागदपत्रांचे मोबाईलवर फोटो काढले. ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात येताच त्यांनी याला हरकत घेतली. त्यानंतर हे फोटो मोबाईलवरून डिलीट करण्यात आले होते.  हेही वाचा

  अवैध बांधकामप्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.