Advertisement

कूपर आणि भाभा रुग्णालयात पर्यावरणाला ‘ऑक्सिजन’


कूपर आणि भाभा रुग्णालयात पर्यावरणाला ‘ऑक्सिजन’
SHARES

रुग्णालयात जाताना आपण अनेकदा नाकावर रुमाल ठेवतो. त्यात पालिका रुग्णालय म्हणजे स्वच्छतेच्या नावावर बोंब असाच काहीसा आपला समज असतो. पण आता ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. कारण, पालिकेच्या कूपर रुग्णालयात आता कचरा कमी आणि झाडे जास्त पहायला मिळतील.

पालिकेचे कूपर रुग्णालय गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवत आहे. या खताचा वापर रुग्णालयातील आवारातच असणाऱ्या झाडांसाठी केला जात आहे. जवळपास साडेसहाशे खाटांच्या कूपर रुग्णालयात हा प्रकल्प अगदी जोमाने सुरू आहे.


कसे तयार करतात गांडूळ खत? 

रुग्णालयाच्या उपाहारगृहातील अन्न किंवा खाद्यपदार्थ फेकण्याऐवजी त्याचा वापर खत निर्मिती करण्यासाठी केला जातो. उरलेले खाद्यपदार्थ, अन्न किंवा कचरा रुग्णालयातील मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या एका चौकोनी जागेत जमा केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने तो कचरा बारीक केला जातो. त्यात नंतर गांडूळ सोडले जातात. गांडूळ ते अन्न खातात आणि त्यांच्या विष्ठेतून गांडूळ खताची निर्मिती केली जाते.


अन्य कार्यालयांनाही पुरवले जाते खत

कूपर रुग्णालयाच्या आवारात लहान-मोठी अनेक झाडे आहेत. त्या झाडांनाही हे खत दिले जाते. तसेच रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेला हे खत पुरवले जाते. शिवाय पालिकेच्या आणि अन्य रुग्णालयाच्या, कार्यालयाच्या परिसरातील झाडांनाही कूपर रुग्णालयातूनच खत पुरवले जाते.


पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. वाया जाणारं जेवण फेकून न देता त्याचा वापर करुन त्यातून गांडूळ खत निर्माण केलं जात आहे. जवळपास एका दिवसात 25 ते 30 किलो गांडूळ खत तयार केलं जातं. मलनि:सारणाचं पाणी शुद्ध करुन ते तिथल्या झाडांसाठी वापरलं जातं. म्हणजे पाण्याचा अपव्यय टळतो. वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. गणेश शिंदे, वैद्यकीय प्रमुख, कूपर रुग्णालय

या कामात विलेपार्लेतील महिला बचत गटाचाही समावेश आहे. रुग्णालयातील गांडूळ खत निर्मिती आणि मलनि:सारण, पाण्याच्या शुद्धीकरणाच्या कामात कर्मचाऱ्याचांही मोलाचा सहभाग असल्याचं डॉ. गणेश शिंदे यांचं म्हणणं आहे.


भाभा रुग्णालयात जैवइंधन प्रकल्प

पालिकेच्या भाभा रुग्णालयातही जैवइंधनाची निर्मिती करण्यासाठी भर दिला जात आहे. उपहारगृहातील ओला कचरा फेकून देण्याऐवजी त्याचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी केला जात आहे.


कशी होते बायोगॅसची निर्मिती?

भाभा रुग्णालयातील जेवणाचा कचरा फेकून दिला जात नाही. तर, तो सातव्या मजल्यावरुन एका पाईपवाटे खाली आणला जातो. नंतर तो कचरा मशीन द्वारे यंत्रात भरला जातो. त्यातून निर्माण झालेला गॅस हा भाभा रुग्णालयातील रुग्णांसाठी जेवण तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच इथल्या रुग्णांना जेवण पुरवले जाते.


रुग्णालयात रुग्णांसाठी बाहेरुन जेवण आणण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे आमचे कर्मचारी उपहारगृहात जेवण तयार करतात. भाभा हे 436 बेडचे पालिकेचे रुग्णालय आहे. जवळपास 6 महिन्यांपासून हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत. आधी गॅस सिलेंडरचा वापर केला जायचा. पण, आता एका शेगडीला पुरेल एवढा गॅस तयार होतो.  जवळपास 200 किलो एवढा गॅस दिवसाला तयार होतो.

डॉ. प्रदीप जाधव, वैद्यकीय प्रमुख, भाभा रुग्णालय

भाभा आणि कूपर या दोन्ही रुग्णालयात सुरू करण्यात आलेले प्रकल्प हे आपल्या पर्यावरणाला खरंच ऑक्सिजन देण्याचं काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यासाठी मदत होईल.




हेही वाचा

टाकाऊ फुलांपासून माहीम चर्चने केली बायोगॅसची निर्मिती


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा