Advertisement

मुंबई महापालिकेची 125 वर्ष जुनी चावी तुटली!


मुंबई महापालिकेची 125 वर्ष जुनी चावी तुटली!
SHARES

एकीकडे मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे पालिकेच्याच ऐतिहासिक वारशाचा भाग असलेली एक ऐतिहासिक चावी तुटली. ही चावी होती पालिका मुख्यालयाच्या मुख्य दरवाजाची!

मुंबई पालिका मुख्यालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी १ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. परंतु योगायोग असा की याच दिवशी महापालिका सभागृहाची ऐतिहासिक चावी तुटली. तब्बल १२५ वर्षे जुनी ही चावी होती आणि महापालिका सभागृहाचा दरवाजा उघडतानाच ही चावी तुटली. त्यामुळे एका बाजूला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ केला जात असतानाच ही चावी तुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फ्रेड्रि‍क विल्यम स्टीव्हन्स या नावाजलेल्या वास्तुशिल्पकाराने या मुख्यालयाच्या इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार केल्यानंतर २५ एप्रि‍ल १८८९ रोजी इमारतीचे बांधकाम सुरु झाले आणि ३१ जुलै १८९३ रोजी हे बांधकाम पूर्ण झाले. ज्या मंडळींनी या इमारतीचे आराखडे बनविले, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ही इमारत १२४ वर्षे पूर्ण होऊनही आजही खंबीरपणे उभी आहे. या महापालिका मुख्यालयात २३२ नगरसेवकांना बसण्यासाठी प्रशस्त सभागृह आहे. याच सभागृहाच्या दरवाजाची चावी तुटली.


बनावट चावीद्वारे उघडले सभागृह

काही महिन्यांपूर्वी महापालिका सभागृहाला आग लागून दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा याचे नुतनीकरण करण्यात आले. परंतु, या नुतनीकरणामध्ये सभागृहाचे जुने दरवाजे कायम ठेवण्यात आले. त्यामुळे या सभागृहातील जुनी टाळी आजही वापरात आहेत. मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातले शिपाई जेव्हा मुख्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाच नेमकी ही चावी तुटली. चावीचा अर्धा भाग यावेळी लॉकमध्येच अडकला. मात्र, हा चावीचा तुकडा काढून अखेर बनावट चावीने दरवाजा उघडण्यात आला.

महापालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीच या चावीची बनावट चावी तयार करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी होण्याची शक्यता असलेला गोंधळ टळला. त्यानंतर ही तुटलेली चावी पुन्हा महापालिका आयुक्तांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, महापालिका मुख्यालयाच्या देखभाल विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांनी मात्र आपल्याला याबाबत कल्पना नसून आपण माहिती घेत असल्याचे सांगितले.



हेही वाचा

लग्नाच्या हुंड्यात मिळाली होती मुंबई!

विद्युत रोषणाईची संकल्पना मांडणाऱ्यालाच महापालिका विसरली!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा