Advertisement

तिवरांना संरक्षक भिंतींचं कवच, ३० किमीची भिंत बांधणार


तिवरांना संरक्षक भिंतींचं कवच, ३० किमीची भिंत बांधणार
SHARES

मुंबईच्या किनारपट्टीसह खाडीलगतच्या तिवरांना संरक्षक देण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा मार्ग अखेर उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या आदेशामुळे मोकळा आणि सोपा झाला आहे. त्यानुसार कांदळवन कक्षाने आता कुलाब्यापासून थेट भिवंडीपर्यंत संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंदाजे ३० किमीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला दिवाळीपासून सुरुवात करण्याचा मानस असून हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करत तिवरं संरक्षित करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कांदळवन कक्षाचे उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


'तिवरांना संरक्षण द्या'

तिवरांची कत्तल करत तिवरांच्या जागेवर अतिक्रमण केलं जात असून त्यामुळे तिवरांची जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळं तिवरांचं संरक्षण करण्यासाठी बेकायदा अतिक्रमण हटवणं, तिवरांची कत्तल रोखणं आणि संरक्षक भिंत बांधत तिवरं संरक्षित करणं ही कामं कांदळवण कक्षाकडून केली जातात. मात्र संरक्षण भिंत बांधण्यामध्ये अनेक तांत्रिक आणि इतर अडचणी येत असल्यानं बफर झोनबाबत स्पष्टता नसल्यानं अनेक अडचणी येत होत्या. आता मात्र सोमवारी उच्च न्यायालयानं ५० मीटरचा बफर झोन सीआरझेड-१ मध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर या बफर झोनमध्ये कोणतंही अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केली आहे. तर बफर झोनमध्ये संरक्षक भिंत बांधत तिवरांना संरक्षित करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.


१०० कोटींचा खर्च अपेक्षित

न्यायालयाच्या या आदेशामुळे संरक्षक भिंत बांधण्याचं कांदळवण कक्षाचं काम आता सोप झालं आहे. त्यानुसार दिवाळीपासून संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून कुलाब्यापासून भिवंडीपर्यंतच्या तिवरांच्या पट्ट्यात या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार ३० किमीचं हे संरक्षक भिंतीचं काम असणार आहे. तर यासाठी अंदाजे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचंही घोडके यांनी सांगितलं आहे.


अडचणी दूर

कुलाबा ते भिवंडीदरम्यान गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर तिवरांच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलं आहे. काही ठिकाणीच आता अतिक्रमण असून ही अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात येणार असल्याचंही कांदळवन कक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर अतिक्रमण हटवण्यात आल्यानं संरक्षक भिंती बांधण्यातल्या अडचणीही दूर झाल्यानं आता लवकरच संरक्षक भिंती बांधत तिवरांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यात येणार आहे.


हेही वाचा - 

तिवरांना नवसंजीवनी! १००० चौ. मीटरचा परिसर राहणार सीआरझेड-१ मध्येच

मेट्रोचा मोर्चा आता मुंबईतल्या तिवरांकडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा