Advertisement

तिवरांलगत लवकरच संरक्षण भिंती, पंधरा दिवसांत काढणार निविदा


तिवरांलगत लवकरच संरक्षण भिंती, पंधरा दिवसांत काढणार निविदा
SHARES

मुंबईतील तिवरांची बेकायदा कत्तल आणि तिवरांच्या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी मुंबई कांदळवण कक्षाने संरक्षण भिंतीचे संरक्षण तिवरांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून यासाठी अंदाजे 80 कोटींपैकी 13 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील संरक्षण भिंतीच्या कामाचा मार्ग मोकळा झाल्याने आता पंधरा दिवसांत पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती कांदळवण कक्षातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर तिवरांचे जंगल असून गेल्या काही वर्षांत ही जंगले हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तिवरांची बेकायदा कत्तल करून त्या जागेवर बेकायदा अतिक्रमणे केली जात आहेत. त्यामुळेच सध्या मुंबईत अंदाजे 5,400 हेक्टर इतकेच तिवरांचे जंगल उरले आहे. आता या अस्तित्वात असलेल्या तिवरांच्या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी कांदळवण कक्षाने कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या सहा महिन्यात कुलाबा, मालवणीसारख्या अनेक ठिकाणच्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करत मोठ्या संख्येने अतिक्रमणे हटवली आहे.

आता मोकळा झालेला तिवरांचा परिसर संरक्षित करत यापुढे तिवरांची कत्तल होऊ नये आणि अतिक्रमणे होऊ नये यासाठी कांदळवण कक्षाने संरक्षण भिंतीचा उपाय शोधून काढला आहे. तिवरांच्या क्षेत्रापासून काही दूर अंतरावर अंदाजे 10 फुटाच्या संरक्षण भिंती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वच्या सर्व 5,400 हेक्टर तिवरांना संरक्षण भिंतीचे संरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 80 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात अतिसंवेदनशील अशा कुलाबा आणि मालवणी येथील तिवरांच्या जंगलात संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

तिवरांच्या रक्षणासाठी लवकरच संरक्षण भिंती

गोराईतील तिवरांच्या कत्तलीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा