गोराईतील तिवरांच्या कत्तलीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

  Gorai
  गोराईतील तिवरांच्या कत्तलीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
  मुंबई  -  

  गोराई-उत्तन इथल्या 88 एकरवरील तिवरांची कत्तल पॅन इंडिया पर्यटन लि. (एस्सेल वर्ल्ड) कंपनीकडून करण्यात आल्याबाबत महानगरपालिका, कांदळवण कक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करूनही या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. मात्र न्यु रोड रेसिडेन्सी फोरमने यासंबंधी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यानुसार गुरूवारी म्हणजेच 27 एप्रिलला सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडून तिवरांच्या कत्तलीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती तक्रारकर्ते माहिती अधिकारी हरिश पांडे यांनी दिली.

  गोराई इथल्या तिवरांची कत्तल कंपनीकडून सुरूच आहे. आधी 15 एकरवर तिवरांची कत्तल केल्यानंतर आता हा आकडा थेट 88 एकरवर गेला आहे. त्यामुळे पांडे यांनी यासंबंधी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, कांदळवण कक्षानेही या तिवरांच्या कत्तलीची चौकशी करत अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार तिवरांची कत्तल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. असे असताना अखेर पांडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून गुरूवारी गोराईची पाहणी होणार आहे.

  या पाहणीत आणि त्यानंतरच्या चौकशीत तिवरांची कत्तल झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने पाहणीसंबंधीच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता तरी तिवरांची बेसुमार बेकायदा कत्तल करणाऱ्यांना दणका बसतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.