Advertisement

‘आरे’ कारशेडचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिका

मेट्रो -३ च्या कारशेडसाठी गोरेगावच्या आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली.

‘आरे’ कारशेडचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिका
SHARES

मेट्रो -३ च्या कारशेडसाठी गोरेगावच्या आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून पर्यावरणप्रेमींना मात्र जबर धक्का बसला आहे. याप्रकरणी निराशा हाती आलेले पर्यावरणप्रेमी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. 

गेल्या २ महिन्यांपासून याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होती. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवत ४ ऑक्टोबरला सुनावणी होईल, असं स्पष्ट केलं होतं.

कुठल्या याचिका?

आरेतील झाडे तोडण्याच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिलं होतं. या याचिकेला समर्थन देणारी रिट याचिका मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व मुंबई वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य यशवंत जाधव यांनी केली होती. मेट्रो कारशेडचे बांधकाम मिठी नदीच्या पूरक्षेत्रात असल्याचा दावा करणारी आणखी एक रिट याचिका बाथेना यांनी दाखल केली होती. तर आरे कॉलनी हे वनक्षेत्र असून देखील राज्य सरकारने तशी अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ही अधिसूचना काढण्याचे निर्देश सरकारला देण्याची मागणी करणारी जनहीत याचिका वनशक्ती संस्थेने दाखल केली होती. 

५० हजारांचा दंड

या एकत्रित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सोमवारपासून सुनावणी सुरू झाली. शुक्रवारी झालेल्या सुनावणी न्यायालयाने आरेतील कारशेडविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या. सोबतच यशवंत जाधव यांना ५० हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. यापैकी २ याचिका 'आरे कॉलनी वनक्षेत्र' आणि 'मिठी नदी पूरक्षेत्र' या दोन्ही विषयाशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने याचिकादारांनी तिथे जाण्याचा सल्ला देत खंडपीठाने फेटाळून लावल्या. यामुळे आरेत मेट्रो ३ साठी कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



हेही वाचा-
आरे कॉलनीत कारशेड होणार? शुक्रवारी समजणार अंतिम निकाल
आरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा