मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

  BKC
  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प
  मुंबई  -  

  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी बीकेसीतील जागा देण्यास राज्य सरकारने होकार दिल्याची चर्चा असली तरी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून जागा देण्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळाला नाही. असे असले तरी लवकरच बीकेसीत बुलेट ट्रेनच्या कामासाठी रेल्वेकडून माती परिक्षणाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने संबंधित यंत्रणेला परवानगी दिल्याची माहिती सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे.

  बीकेसीतील 67 एकरच्या जागेवर एमएमआरडीएकडून इंटरनॅशनल फायनान्स सेंटर उभारण्यात येणार असून हा एमएमआरडीएसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या 67 एकर जागेतील 10 एकर जागा बुलेट ट्रेनसाठी हवी आहे. बीकेसी हे बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक असणार आहे. एमएमआरडीएने मात्र ही जागा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग अडला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच बीकेसीची जागा देण्यास होकार दिला असून यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होईल असे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. मुंबई लाइव्हने यासंबंधी एमएमआरडीएशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. मात्र त्याचवेळी काही अधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत एमएमआरडीने होकार दिला नसल्याचे सांगितले होते.

  गेल्या आठवड्यात शुक्रवारी बीकेसीत संबंधित कंत्राटदाराकडून बुलेट ट्रेनसाठी माती परिक्षणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. बुलेट ट्रेनसाठी माती परिक्षण करण्यात येत असल्याचे समजल्याबरोबर एमएमआरडीएने माती परिक्षणाचे काम रोखले. त्यामुळे एमएमआरडीएचा जागा देण्यास विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र एमएमआरडीएने माती परिक्षणास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या दबावामुळे एमएमआरडीएला माती परिक्षणाच्या कामाला परवानगी द्यावी लागली आहे का, अशी चर्चा आहे. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही माती परिक्षणास परवानगी म्हणजे जागा देण्यास होकार असा होत नसल्याचे म्हणत जागा देण्यास एमएमआरडीएचा विरोध असल्याचेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा ‘बुलेट’ घोळ कधी संपणार हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.