Advertisement

राणीच्या बागेचं अस्तित्व धोक्यात


SHARES

भायखळा - वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग. कधी काळी राणीवानी थाट होता या प्राणीसंग्रहालयाचा. पण आज याची अवस्था कुणाला पाहावणार नाही. त्यामुळे पर्यटकांनीही या प्राणीसंग्रहालयाकडे पाठ फिरवलीय. प्राणीसंग्रहालयातील प्राण्याची अक्षरश: केविलवाणी अवस्था झालीय. त्यांच्या खाण्याचेच नाही तर राहण्याचेही हाल होतायत. एका पिंजऱ्यात चक्क हरीण आणि मगरीला एकत्र ठेवण्यात आलंय. तर सफेद कॉकटिल आणि मोराला एकत्र ठेवण्यात आलंय. काही पिंजरे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर सुरक्षेसाठी लावण्यात आलेलं कुंपणही तुटलंय. इथं येणारे पर्यटक खुलेआम धुम्रपान करतात. तर काही तरूण टवाळकी करतात. त्यामुळे इथल्या सुरक्षेचे तर तीन तेराच वाजलेत. प्राण्यांच्या तलावातील पाणी तर बघवणार नाही, एवढं खराब आहे. नुकताच या उद्यानात असलेल्या आठपैकी एका दीड वर्षाच्या हम्बोल्ट मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. उकिरडा आणि घाणीत हे प्राणी कसे श्वास घेतील, हा एक प्रश्नच आहे.

प्राणीसंग्रहालयाची ही अवस्था झाली असतानाही मुंबई महानगरपालिका या उद्यानाचा पुनर्विकास करण्याचा घाट घालतेय. आधीच या उद्यानासाठी पालिकेनं 150 कोटी रुपयांचा खर्च केला. एवढा खर्च करून साफसफाईसाठी आणलेल्या मशीन धूळ खात पडल्यात. कारण कर्मचाऱ्यांना या मशीन हाताळताच येत नाहीत. प्राणीसंग्रहालयातील हे दृश्य पाहून तर ते 150 कोटी पाण्यात गेल्याचंच चित्र आहे. त्यामुळे पालिका हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतेय असंच म्हणावं लागेल.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं ( Centrl Zoo Authority) जिजामाता उद्यानाला नोटीस बजावलीय. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्राणीसंग्रहालयात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात. "केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं पाठवलेली नोटिस उद्यानातील अंतर्गत गोष्ट आहे. यात काही न्यूज नाही," असं उद्यानाचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सागितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा