Advertisement

नव्या कोऱ्या ४० गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये धुळखात!

सुमारे ४० गाड्या सध्या वरळीतील गॅरेजमध्ये धुळखात पडल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या गाड्या वरळी गॅरेजमध्ये आहेत. परंतु, या गाड्यांचे वितरण करण्यात न आल्याने नव्या कोऱ्या गाड्या वाटपाअभावी पडून आहेत.

नव्या कोऱ्या ४० गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये धुळखात!
SHARES

मुंबई महापालिकेच्या खातेप्रमुखांसह प्रमुख अभियंत्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या सुमारे ४० गाड्या सध्या वरळीतील गॅरेजमध्ये धुळखात पडल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या गाड्या वरळी गॅरेजमध्ये आहेत. परंतु, या गाड्यांचे वितरण करण्यात न आल्याने नव्या कोऱ्या गाड्या वाटपाअभावी पडून आहेत. त्यामुळे या गाड्यांचे वाटप का करण्यात येत नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


दररोज गाड्यांची नुसतीच ट्रायल!

मुंबई महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध खात्यांच्या विभाग प्रमुखांची आणि प्रमुख अभियंत्यांसह सहायक आयुक्तांची वाहने जुनी झाल्याने ती बदलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यामुळे या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून ही वाहने वरळी गॅरेजमध्ये उभी करण्यात आली आहेत. परंतु, या गाड्यांचे वितरणच अद्याप केले जात नाहीये. त्यामुळे दरदिवशी या गाड्या चालवून त्यांची ट्रायल घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घ्यावी लागत आहे.



उपायुक्तांना दिलेल्या गाड्याही परत घेतल्या

या गाड्यांपैकी दोन गाड्या या उपायुक्तांना दिल्या होत्या. परंतु, दुसऱ्याच दिवशी या गाड्या त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. परंतु त्यानंतर या गाड्यांचे वाटप अद्यापही करण्यात आलेले नाही.


आयुक्तच म्हणाले वितरण नको!

घनकचरा विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या गाड्यांचे वितरण हे महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार थांबवण्यात आल्याचे सांगितले. या गाड्या पूर्वी सरसकट बदलल्या जाणार होत्या. परंतु ज्या गाड्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत किंवा अधिक किलोमीटर वाहतूक झालेली आहे, अशा गाड्यांची यादी बनवून त्याप्रमाणे त्यांचे वाटप सर्वांना केले जावे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याच्या गाड्यांची माहिती घेऊन त्यांची गाडी जुनी असेल, तर त्याप्रमाणे त्यांना गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले. याबाबतची सर्व प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेनंतर याचे वाटप केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

ठाकूर व्हिलेजच्या रहिवाशांचे 'ऑपरेशन खटारा'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा