Advertisement

ठाकूर व्हिलेजच्या रहिवाशांचे 'ऑपरेशन खटारा'


ठाकूर व्हिलेजच्या रहिवाशांचे 'ऑपरेशन खटारा'
SHARES

अनेकदा आपण रस्त्याच्या कडेला एखादी खराब अवस्थेतली कार, बाईक किंवा इतर कुठली तरी गाडी पाहिली असेल. रस्त्यावरच कशाला, अगदी स्वत:च्या कॉलनीत किंवा घराबाहेर देखील अशा गाड्या धूळ खात कित्येक दिवस पडलेल्या असतात. या गाड्यांचा कुणी माय-बाप नसतो. या धूळ खात पडलेल्या गाड्यांना आपण खटारा बोलतो.



किती दिवसांपासून धूळ खात पडलीय ही कार? कुणाची आहे? पोलिस आणि आरटीओ काही करतात की नाही? असे प्रश्न अनेकांना पडतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही. 'हे आपलं काम नाही' असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण याच खटारा गाड्यांविरोधात कांदिवलीतल्या ठाकूर व्हिलेजमधल्या रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकूर व्हिलेजच्या रहिवाशांनी 'ऑपरेशन खटारा' या नावानं एक मोहीमच हाती घेतली आहे.



ऑपरेशन खटारा काय आहे?

कांदिवलीतल्या ठाकूर व्हिलेजमधील 'सोच सयानी' हा ग्रुप अनेक वर्षांपासून परिसरात विविध उपक्रम राबवत असतो. या उपक्रमांंतर्गत त्यांनी 'ऑपरेशन खटारा' ही मोहीम सुरू केली आहे. एक महिन्यापूर्वी त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे. १५० सदस्य असलेल्या सोच सयानी ग्रुपनं एक कॅटलॉग तयार केला आहे. या कॅटलॉगमध्ये परिसरात धूळ खात पडलेल्या खटारा गाड्यांची नोंद करण्यात आली आहे. 'सोच सयानी'चे सदस्य हा पूर्ण कॅटलॉग पुढच्या आठवड्यात महापालिका आणि आरटीओकडे सूपूर्द करणार आहेत. अजून एक आठवडा तरी ही मोहीम चालू राहणार आहे. या मोहिमेत त्यांनी आत्तापर्यंत परिसरातील जवळपास ५० खटारा गाड्यांची नोंद केली आहे.



'सोच सयानी' या ग्रुपच्या सदस्यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे. परिसरात एखादी खटारा गाडी निदर्शनास आली, तर त्याचा फोटो आणि लोकेशनची नागरिकांनी नोंद घ्यावी. यासाठी एक फॉर्म तयार करण्यात आला आहे. रहिवाशांनी या फॉर्ममध्ये त्या खटारा गाडीची सर्व माहिती भरणं आवश्यक आहे. या फॉर्मच्या आधारे त्यांनी कॅटलॉग मेंटेन केला आहे. हाच कॅटलॉग आणि एक पत्र पालिका आणि आरटीओला देण्यात येईल. त्यानंतर या गाड्यांची कशी आणि कुठे व्हिलेवाट लावायची? ही जबाबदारी पालिका आणि आरटीओची असेल.


कशी सुचली संकल्पना?


मुंबईमध्ये तुम्ही कुठेही जा. तुम्हाला एक तरी खटारा गाडी नक्कीच आढळेल. अशाच एका गाडीखाली आमच्या परिसरातील इमारतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती. ती पाईपलाईन दुरुस्त करणं गरजेचं होतं. पण ती खटारा गाडी तिथं उभी असल्यानं हे शक्य होत नव्हतं. त्यातूनच आम्हाला ही संकल्पना सुचली.

ललित कुमार, सदस्य, सोच सयानी



'ऑपरेशन खटारा' या मोहिमेत हर्षा उडुपी यांच्यासोबतच हेमा राव, ललित कुमार, रवी कालरा, श्रृती पात्रा आणि इतर सदस्य जोमानं कामाला लागले आहेत. यापैकीच एक सदस्य हेमा राव यांनी सांगितलं की, ठाकूर व्हिलेज परिसरातील प्रत्येक रस्त्यावर आम्हाला दोन तरी खटारा गाड्या दिसल्या आहेत. त्यापैकी अनेक गाड्यांच्या काचा आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. आता तर पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात या गाड्यांमध्ये पाणी साचणार. पाणी साचणं म्हणजे डासांना आमंत्रण आहे. या खटारा गाड्यांमुळे पुढे जाऊन परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढू शकतो'.

पुढच्या आठवड्यात पालिका आणि आरटीओला निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर आरटीओ या खटारा गाड्यांवर नोटीस लावेल. या गाड्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. १५ दिवसांमध्ये जर गाड्यांच्या मालकांनी गाड्या हटवल्या नाहीत, तर त्या टो करण्यात येतील, अशी माहिती 'सोच सयानी'च्या सदस्या श्रृती पात्रा यांनी दिली आहे.



परिसरातील या खटारा गाड्यांमध्ये काही अघटित घडण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा अशा खटारा गाड्या दारूचे अड्डे बनायला देखील वेळ लागत नाहीत. त्यामुळे आता तरी या समस्येचा गांभीर्यानं विचार करून पालिका आणि आरटीओ दोघांनी कारवाई करावी.



हेही वाचा

कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा