Advertisement

उन्हाळी सुट्टीत कोकणात जाताय, दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल

यामुळे प्रवाशांचे अडीच तास वाचणार आहे.

उन्हाळी सुट्टीत कोकणात जाताय, दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल
(File Image)
SHARES

उन्हाळी सुट्टीनिमित्त सहकुटुंब दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

सुधारित वेळेनुसार दिवा स्थानकातून अडीच तास उशिराने अर्थात सायंकाळी ५.५० वाजता पॅसेंजर रवाना होणार असून, रात्री १२.३० वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचणार आहे. आज, बुधवारपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॅसेंजर दुपारी ३.२० मिनिटांनी रवाना होते व रत्नागिरी स्थानकात रात्री १२.३० वाजता पोहोचते. 

मध्य रेल्वेचे रोह्यापर्यंत आणि कोकण रेल्वेचे वीर स्थानकापर्यंत दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे पॅसेंजरला स्थानकादरम्यान सायडिंगला थांबवण्यात येणार नाही. याचा परिणाम म्हणून प्रवासवेळेत बदल होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामुळे गाडी क्रमांक ५०१०३ दिवा-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून उशिरा निघून सध्याच्या वेळेतच रत्नागिरी स्थानकात पोहोचता येणार आहे. यामुळे प्रवाशांचे अडीच तास वाचणार आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजरच्या वेळेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

दिवा पॅसेंजर रोहा स्थानकात रात्री ८.०७ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर पनवेल, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे स्थानकांवर थांबते. यामुळे मेल-एक्स्प्रेसपेक्षा पॅसेंजर गाडीला प्रवाशांची प्रथम पसंती असते. या गाडीच्या वेळेत दिवा स्थानकात गर्दी नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीदेखील तैनात करण्यात येतात.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा