Advertisement

व्यायामासाठी घराबाहेर पडू शकतात मुंबईकर, पोलीस आयुक्तांनी दिली परवानगी

जमावबंदी दरम्यान मुंबईकर ‘वर्कआऊट’ अर्थात व्यायामासाठी बाहेर जाऊ शकतात, असा खुलासा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.

व्यायामासाठी घराबाहेर पडू शकतात मुंबईकर, पोलीस आयुक्तांनी दिली परवानगी
SHARES

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या जमावबंदी दरम्यान मुंबईकर ‘वर्कआऊट’ अर्थात व्यायामासाठी बाहेर जाऊ शकतात, असा खुलासा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. पोलीस कारवाईच्या धास्तीने सध्या बहुतेक मुंबईकर घरातच अडकून पडले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबईकरांना ही दिलासादायक माहिती दिली आहे. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकलिंग, जाॅगिंग, रनिंग, वाॅकिंग अशा व्यायामासाठी मुंबईकर घराबाहेर जाऊ शकतात. आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत पहाटे ५ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान हे व्यायामप्रकार करण्यास परवानगी असेल, असं सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. 

 हेही वाचा - मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी

मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रक काढून दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैच्या मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर पडण्याची परवानगी आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करण्यास परवानगी आहे. तर रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या वर गेली आहे. मिशन बिगीन अंतर्गत सरकारनं लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

या काळात सकाळी व्यायामासाठी घराबाहेर निघणाऱ्या मुंबईकरांना देखील पोलिसांकडून अडवण्यात येत होतं. त्यामुळे शारीरिक स्वाथ्य राखण्याच्या उद्देशाने मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबईकरांसाठी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामुळे किमान व्यायामासाठी मुंबईकर सकाळी घराबाहेर पडू शकतील.  

 हेही वाचा- Corona Virus : मुंबईत जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा