Advertisement

चौपाटी चकाचक करण्यापूर्वीच कंत्राटदाराचा पळ


चौपाटी चकाचक करण्यापूर्वीच कंत्राटदाराचा पळ
SHARES

माहीम-दादर चौपाटीच्या स्वच्छतेसाठी नेमणूक करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराने काम करण्यापूर्वीच तेथून पळ काढला आहे. स्थायी समितीच्या मान्यतेपुर्वी प्रशासनाने दोन महिन्यांचे काम या कंत्राटदाराला आपल्या अधिकारात दिलं होतं. परंतू, हे काम करण्यापूर्वी या कंत्राटदाराने आपण हे काम करू शकणार नाही, असं सांगत कंत्राटातून माघार घेतली आहे.

 पळ काढणाऱ्या विशाल प्रोटेक्शन फोर्स या कंपनीला काळया यादीत टाकण्यात येत असून त्याची सर्व अनामत रक्कम जप्त करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केलं. कंत्राटदारच पळाल्याने या चौपाटीची आता पावसाळ्यात वाट लागणार आहे.


११ कोटी ६० लाखांचं कंत्राट 

माहीम-दादर चौपाटीच्या साफसफाईसाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कंत्राट कालावधी ४ जून २०१८ ला संपुष्ठात आला. त्यामुळे पुढील सहा वर्षांकरता नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये विशाल प्रोटेक्शन फोर्स ही कंपनी पात्र ठरली.  पुढील सहा वर्षांकरता या कंपनीला ११ कोटी ६० लाखांचं कंत्राट देण्यात येणार होतं.यासाठी पावसाळ्यात प्रतिदिन ६५ हजार रुपये तर पावसाळा वगळता इतर दिवसांमध्ये प्रति दिन ३५ हजार ३१२ रुपये एवढा खर्च या सफाईवर केला जाणार आहे.


प्रस्ताव मागे

 या कंत्राटाला स्थायी समितीची मान्यता मिळण्यापूर्वी प्रशासनाने जुन्या कंपनीला दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन काम करून घेण्याऐवजी पात्र ठरलेल्या कंत्राटदारालाच आपल्या अधिकारात दोन महिन्यांचं कंत्राट बहाल केलं होतं. मात्र, याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी हा प्रस्ताव मागे घेण्यास परवानगी मागितली.

 स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी यावर प्रशासनाला कारणे विचारली असता, त्यांनी संबंधीत कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. त्यानं आपण हे काम करू शकणार नाही, असं कळवलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेत असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली. 



हेही वाचा - 

एन. एम कॉलेजमध्ये मार्कशीट गोंधळ कायम

फायर बाईकच्या खरेदीचा टायर पंक्चर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा