कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आता पालिकेच्या शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण सेवक यांना येत्या २ दिवसांत शाळांत उपस्थित राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
विभागीय अधिकाऱ्यांनी सर्व माध्यमाच्या महानगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलं असून, शाळांमध्ये १०० टक्के उपस्थितीसाठी सूचना दिल्या आहेत. शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक आहे. अशातच अनेक शिक्षक आपापल्या गावी गेले आहेत, तर अनेक शिक्षक रेड झोनमध्ये येत असल्याने त्यांचे प्रवास करणे दूरच, पण बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय शिक्षकांना बुचकळ्यात पाडणारा आहे. गावी गेलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही २ दिवसांत शाळेत उपस्थित राहून उपस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही वाचा -
मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी