Advertisement

मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

मुंबईतून वाहणारी प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सोमवारी केली.

मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी
SHARES

मुंबईतून वाहणारी प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सोमवारी केली. कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करावे, त्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त संयंत्रे व मनुष्यबळ तैनात करुन दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

आयुक्त चहल यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची प्रारंभी माहिम कॉजवे येथील मिठी नदीचे पातमुख (outfall) येथे पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूल मागे आणि बीकेसी पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल (east-west connector) येथेही त्यांनी भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) . संजय दराडे, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) संजय जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त वेलरासू यांनी माहिती दिली की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे २१.५०५ किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. त्यातून गाळ काढून स्वच्छता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रीक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या ९८ हजार ५०० मेट्रीक टन पैकी आतापर्यंत २६ हजार ११८ मेट्रीक टन गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या २९ टक्के काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण उद्दिष्ट गाठले जाईल, अशा रितीने कामास गती देण्यात आली असल्याचेही वेलरासू यांनी सांगितले.

आयुक्त चहल यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर निर्देश दिले की, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. लॉकडाऊनच्या अडचणींवर मात करुन आपण कामांना गती दिली आहे, ही समाधानाची बाब आहे. आता आवश्यक असल्यास अधिक संयंत्रे, मनुष्यबळ तैनात करावे. गरज असल्यास दोन सत्रांमध्ये काम पूर्ण करुन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट नियोजित वेळेत गाठावे, असे ते म्हणाले.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा