कोरोनामुळं मरण पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, रुग्णालयांप्रमाणे आता स्मशानभूमीवर ताणही वाढला आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात असल्यानं या विद्युतदाहिनीत बिघाड झाल्यानं ती बंद असल्याची माहिती ताजी असतनाच आता शिवाजी पार्क येथील विद्युतदाहिनीत बिघाड झाला आहे.
करोनाबाधित मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पालिकेच्या स्मशानभूमींवरदेखील ताण वाढू लागला आहे. दुरुस्तीकरिता शिवाजी पार्क येथील विद्युत दाहिनी ८ ते १० दिवस बंद ठेवावी लागणार आहे. त्याशिवाय, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीतील धूर वाहून नेणाऱ्या चिमणीला तडे गेल्यामुळे आजूबाजूच्या इमारतीतील घरात राखेचे कण पसरत असल्याचे या विभागातील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही विद्युत दाहिनी काही काळ बंद करून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी पत्राद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे.
चेंबूरच्या चरई स्मशानभूमीत देखील कोरोनामुळं मृत झालेले अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी किमान एक तासांचा अवधी लागतो. त्यानंतर काही वेळ ही विद्युतदाहिनी बंद ठेवावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येऊ लागल्याने या विद्युतदाहिनीवर मोठा ताण आला.
विद्युतदाहिनी बिघाड होऊन बंद पडली आहे. त्यामुळं या ठिकाणी येणारे मृतदेह इतर ठिकाणच्या विद्युतदाहिनी असलेल्या स्मशानभूमीत पाठवावे लागत आहेत. काही वेळा करोनाच्या मृतदेहांवरदेखील सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत.
हेही वाचा -
बेस्टमधील कोरोनामृतांची संख्या ८ वर
भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू