Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव


मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्यानं वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या परिसरातील चहावाला काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल १३० पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर कलानगरमधील मातोश्री बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या एका बंगल्यात कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बंगला सील करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण  मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला. तसंच, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याचा थेट संपर्कात आलेलं नाही, असं सांगण्यात येत आहे.

ठाकरे कुटुंबीयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. याआधी मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असणाऱ्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

राज्यात आज ४१६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ७३ हजार  ७९२ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. कोरोनाच्या ३८९० नवीन रुग्णांचं निदान झालं असून सध्या राज्यात ६२ हजार ३५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २३ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ४२ हजार ९०० नमुने पॉझिटिव्ह (१७.३४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५७ हजार  ९४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ५८१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा -

Petrol, Diesel Price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा