Advertisement

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याविरोधात अविश्वास ठराव?


महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याविरोधात अविश्वास ठराव?
SHARES

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्यावतीने अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. नगरसेवक आणि सभागृहाचे अधिकार डावलून अजोय मेहता निर्णय घेत असून महापालिकेच्या प्रशासकीय कामात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशाप्रकारचे आरोप करत विरोधी पक्ष नेते रवीराजा यांनी विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभा बोलावण्यासाठी विरोधी पक्षाने महापौरांना निवेदन सादर केलं आहे.


आयुक्तांना परत पाठवण्याचे अधिकार

महापालिका अधिनियमानुसार सभागृहातील एक अष्टमांश सदस्यांनी पाठिंबा दिल्यास राज्य सरकार नियुक्त आयुक्तांना परत पाठवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभागृहातील एकूण २२७ सदस्यांपैकी एक अष्टमांश सदस्यांच्या पाठबळावर आयुक्तांना परत पाठवण्यासाठी विरोधीपक्ष नेते रावीराजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मनसे यांच्यावतीने हा अविश्वास ठराव आणण्यात येत आहे.


आयुक्तांची संदिग्ध भूमिका

कमला मिलमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव या पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भूमिका संदिग्ध आहे. या प्रकरणात अजोय मेहता यांच्या भोवतीच सर्व चक्र फिरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजोय मेहता यांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. तरी त्यांच्या चौकशी समितीवर विश्वास नसल्याने निवृत्त न्यायाधीशामार्फत ही चौकशी करण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून मागणी होत आहे.


रूफ टाॅफ पाॅलिसीवर निर्णय

हॉटेलची रूफ टॉप पॉलिसी सुधार समितीने नामंजूर केली. त्या पॉलिसीवर सभागृहात निर्णय प्रलंबित आहे. मात्र, आयुक्तांनी या पॉलिसीत बरेच बदल करत आपल्या अधिकारात लागू केली. एक प्रकारे हा सभागृहाच्या अधिकारावरच घाला आहे. सुधार समितीने नामंजूर केलेल्या पॉलिसीत अनेक बदल करत याची अंमलबजावणी केली आणि त्यानुसार गच्चीवरील हॉटेलच्या पार्टीला परवानगी दिली गेली. कमला मिलमधील आगीलाही गच्चीवरील पार्टीच जबाबदार ठरली आहे.


रस्त्यांची कामे परस्पर वगळली

याशिवाय स्थायी समितीने मंजूर केलेल्या रस्त्यांची कामे आयुक्तांनी परस्पर वगळली आणि याची कल्पना स्थायी समितीला दिली नाही. तसेच मुंबईच्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावणार नाही, असं जाहीर करूनही खुद्द अजोय मेहता हे आपल्या निर्णयावर ठाम नाहीत. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावता मुंबईकरांना अशाप्रकारे विल्हेवाट लावण्याची सक्ती केली जात आहे, अशाप्रकारे आयुक्तांकडून मनमानी तसेच निष्काळजीपणे कारभार केला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे घटनेने दिलेल्या अधिकाराचीच पायमल्ली होत असल्याने अजोय मेहता यांच्या विरोधात अविश्वास आणला जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.


भाजपाकडून पाठिंबा अपेक्षित

विकास नियोजन विभागाने बनवलेल्या मोबाइल अॅप उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सभागृहात शिवसेनेने आयुक्तांविरोधात रान उठवलं होतं. त्यामुळे या आयुक्तांना परत पाठवा, अशी मागणी सेनेच्या सदस्यांनी केली होती. पण त्यांनी आयुक्तांविरोधात त्यांनी अविश्वास ठराव आणला नाही. कमला मिलमधील दुर्घटना, अनधिकृत बांधकामांना मिळणारे संरक्षण, या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्यावतीने अविश्वास ठराव मांडला जात आहे. याला शिवसेना आणि भाजपाकडून पाठिंबा मिळणं अपेक्षित असल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

श्रीमंत जीवांचीच चिंता!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा