Advertisement

अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे, दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वडाळ्यातल्या लॉयड्स इस्टेट या ३२ मजली इमारतीला तडे जाऊन तिचा पाया खचला. परिणामी इमारतीच्या सी आणि डी विंग मधील रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ घरं रिकामी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे, दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
SHARES

शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वडाळ्यातल्या लॉयड्स इस्टेट या ३२ मजली इमारतीला तडे जाऊन तिचा पाया खचला. परिणामी इमारतीच्या सी आणि डी विंग मधील रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ घरं रिकामी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. सोबतच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अॅन्टाॅप हिल पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महापालिकेने दोस्ती बिल्डरला इमारतीचं काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.


कुणावर गुन्हा?

दोस्ती बिल्डरचे दीपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम २८७, ३३६, ४३१ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी लॉयड्स इस्टेट लगतच्या जागेत यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने मानवी जीवास धोका उत्पन्न होईल, अशा प्रकारे खोदकाम केल्याप्रकरणी तसंच मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




पावसामुळे खचली इमारत

शनिवारपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी देखील चांगलाच जोर धरला. यामुळे सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास वडाळ्यातल्या अॅन्टाॅप हिल परिसरातील लॉयड्स इस्टेट कंपाऊंडजवळ दोस्ती बिल्डरच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. त्याचवेळी या परिसरातील लॉयड्स इस्टेट या रहिवासी इमारतीच्या बी आणि सी विंगला तडे गेल्याने महापालिकेने येथील रहिवाशांना घर रिकामी करण्याचे आदेश दिले.



नगरसेवकाचे महापालिकेवर आरोप

संरक्षक भिंत कोसळल्यानंतर नगरसेवक सुफियान वनू यांनी सरळ महापालिकेवर आरोप केले आहेत. ते म्हणाले याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली होती. मात्र पालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ढिगाऱ्याखालून ३ ते ४ गाड्या काढल्या असल्या, तरी अजूनही ९ ते १० गाड्या खड्ड्यात अाहेत. महापालिका अतिशय संथ गतीने काम करत आहे.



इमारत कधीची?

लॉयड्स इस्टेट इमारतीचं बांधकाम सन १९९७-९८ मध्ये पूर्ण झालं असलं, तरी २००३ पासून इमारतीत रहिवासी राहायला आली. इमारतीत ५ विंग असून प्रत्येक विंगमध्ये किमान १५० ते २०० रहिवासी राहतात. 


समस्या काय?

या इमारतीसमोरच दोस्ती बिल्डरच्या एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. नवीन इमारतीसाठी पाया खणला जात असल्याने लॉयड्स इस्टेट या २० वर्षे जुन्या इमारतीलाही धोका निर्माण झाला. मागील २ ते ३ वर्षांपासून जलवाहिनी, गॅस वाहिनीला धक्का पोहोचत असल्याने या इमारतीचं बांधकाम थांबवण्यासाठी दीड वर्षांपूर्वी रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारही नोंदवली. पण महापालिकेने नवीन इमारतीचं बांधकाम थांबवण्याऐवजी उलट रहिवाशांनाच नोटीस बजावत घरं खाली करण्याचे आदेश दिले.



आम्ही दोस्ती बिल्डरचे मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन आणि सीईओ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही केली आहे.

- भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे माजी खासदार 



सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच तक्रार केली होती. त्याकडे आधीच लक्ष दिलं असतं, तर दुर्घटना टाळता आली असती. त्यामुळे या तक्रारकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. इमारतीचं स्ट्रक्चरल आॅडिट करून रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था करून देण्याची मागणी आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्यात येईल. या धोरणात्मक निर्णयावर तेच निर्णय घेतील.

- राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना 



हेही वाचा -

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा