Advertisement

चक्रीवादळापासून बचावासाठी NDRF ची ९ पथकं सज्ज

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गोवा, केरळा, कर्नाटका या किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात उतरण्यास मनाई केली आहे.

चक्रीवादळापासून बचावासाठी NDRF ची ९ पथकं सज्ज
SHARES

काही दिवसांपूर्वी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अम्फन नावाच्या चक्रिवादळानं धुडगूस घातला. आता आणखीन एक चक्रिवादळ (Cyclone) महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागा (IMD) नं दिली आहे. येत्या ४८ तासात हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याने या आपात्कालीन परिस्थित NDRF ची 9 पथक सज्ज आहेत. हवामान विभागानं या संदर्भाचील एक फोटो देखील जारी केला आहे. यात चक्रिवादळ भारताच्या दिशेनं येत असल्याचं दिसून येत आहे.

अरबी समुद्रात आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झालं आहे. निसर्ग असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या क्षेत्रातील वातावरण पुढील २४ तासात बिघडण्याची चिन्ह आहे. यातून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या आप्तकालीन परिस्थितीत  नागरिकांना वाचवण्यात NDRF च्या पथकाने मोठी भूमिका बजावली होती  त्याच पार्श्वभूमिवर मुंबईसह कोकण किनार पट्टीत आता NDRF ची 9 पथक तैनात करण्यात आली आहेत. 


यातील 3 पथक मुंबईत, 2 पालघर, तर रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी 1 पथक तैनात करण्यात आलं आहे. तसेच निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गोवा, केरळा, कर्नाटका या किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात उतरण्यास मनाई केली आहे.  निसर्ग चक्रीवादळाची व्याप्ती मुंबईसह दक्षिण गुजरातमधील दमणपर्यंत असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या समुद्रात निर्माण होत असलेलं चक्रीवादळ ३ जून रोजी हरिहरेश्वरला धडकेल.

निसर्ग चक्रीवादळाची पुढील ४८ तासांत तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ ३ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २ ते ४ जून दरम्यान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे. कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी मान्सून केरळात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. त्या अनुषंगाने केरळच्या ९ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अलपुझा, कोल्लम, पथनमथिट्टा, तिरुवनंतपुरम, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्यानुसार, १८९१ नंतर प्रथमच अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात वादळाची परिस्थिती उद्भवली आहे. हिंदुस्तान टाईम्सने हवामानशास्त्रज्ञ अक्षय देवरस यांच्या हवाल्याने असं नमूद केलं आहे की, १९४८ आणि १९८० मध्ये यापूर्वी दोनदा असे चक्रिवादळ आले होते. परंतु नंतर ही परिस्थिती टाळली गेली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा