Advertisement

मुंबई महापालिकेचा वीज निर्मितचा श्रीगणेशा


मुंबई महापालिकेचा वीज निर्मितचा श्रीगणेशा
SHARES

मुंबईतील देवनार कचरा भराव भूमीतील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रीया करून त्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी अद्यापही त्यातून वीजेची निर्मिती होऊ शकली नाही. परंतु देवनार कचरा भराव भूमीतून नव्हे पण देवनार पशुवधगृहातून पहिल्या वीज निर्मितीचा किरण पडलेला आहे. देवनार पशुवधगृहात दरदिवशी 15 हजार किलो जैवीक कचऱ्यावर प्रक्रीया करून वीजेची निर्मिती करण्यत येत आहे. यापासून अवघ्या 40 दिवसात एक हजार युनिट एवढी वीजेची निर्मिती करत महापालिकेने वीज निर्मितीचा श्रीगणेशा केला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या पशुवधगृहांपैकी एक असा लौकिक असणाऱ्या महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात दररोज निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यापासून भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने (बीएआरसी)  प्रायोगिक तत्वावर वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला 5 मार्चपासून सुरुवात झाली. दररोज 15 हजार किलो जैविक कचऱ्यावर प्रक्रीया करण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पात सध्या 7 ते 8 हजार किलो एवढा जैविक कचरा वापरून वीज निर्मिती करण्यात येत आहे. या जैविक कचऱ्यापासून दररोज सुमारे 400 ते 450 घनमीटर मिथेन गॅस तयार होत आहे. या गॅसच्या आधारे 62.5 केव्हीए (62.5 KVA) क्षमतेचे जनित्र वापरून सध्या 40 युनिट विजेची निर्मिती होत आहे. भविष्यात या ठिकाणी दररोज 20 हजार किलो जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. यामुळे लवकरच देवनार पशुवधगृहात 'शून्य कचरा' ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवणे शक्य होणार आहे.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन आणि उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात येत असलेल्या या वीज निर्मितीच्या प्रायोगिक प्रकल्पातून गेल्या 40 दिवसांच्या कालावधीत सुमारे 1 हजार युनिट ऐवढी वीज निर्मिती झाल्याची अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे. हा प्लँट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ही वीज निर्मिती दररोज 75 युनिटपर्यंत वाढविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवनार पशुवधगृहातच वीजेचा वापर

या प्रायोगिक प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सध्या देवनार पशुवधगृहातच वापरण्यात येत आहे. ज्यामुळे पशुवधगृहाच्या वीज खर्चात काही प्रमाणात बचत करणे देखील शक्य झाले आहे. या प्रकल्पातून उत्पन्न होणाऱ्या विजेपासून देवनार पशुवधगृहातील पंप, श्रेडर मशिन, विद्युत दिवे, पंखे, एअर सर्क्यूलेटरी पंखे, एक्झॉस्ट पंखे, हॅलोजन दिवे, पथदिवे, विद्युत दिवे यासारखी विद्युत उपकरणे चालवली जात असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा