Advertisement

तर गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिवांना तात्पुरते विशेष पोलीस अधिकार

कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहतील याची काळजी घ्यावी

तर गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिवांना तात्पुरते विशेष पोलीस अधिकार
SHARES

कोरोना (coronavirus) रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहतील याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार देण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कोकण, पुणे आणि नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे  आयुक्त, तसंच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची कोरोनाविषयक आढावा बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते.

रेमडेसिवीरचा तुटवडा नको

यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा- महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

शाॅर्ट सर्किट होता कामा नये

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत, कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी, उपचारांचा व इतर सुविधांचा दर्जा चांगला राहील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः भेट द्यावी, उन्हाळा सुरू झाल्याने पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत, शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देशही एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिले.

रक्ताचा पुरवठा नियमितपणे व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं. गर्दीचं नियमन करावं, मास्क परिधान करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.

ज्या महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना निधीची गरज आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवावेत. त्यांना डीपीडीसी आणि एसडीआरएफमधून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करण्यात येईल, तसंच नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

(eknath shinde orders to give special police powers to housing society president to avoid spread of covid 19)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा