Advertisement

एसटी महामंडळाचा कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय


एसटी महामंडळाचा कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय
SHARES

एसटी महामंडळाकडून ५५ हजार आंदोलकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तसंच कंत्राटी तत्त्वावर नव्या चालकांची भरती करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता एसटी आंदोलक यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अनेकदा मुदत देऊनही संपकरी कर्मचारी कामावर परतायला तयार नसल्याने आता एसटी महामंडळाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल ११४४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर ११०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वेतनही वाढवून देण्यात आले होते. मात्र, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संपकरी आग्रही आहेत. त्याशिवाय कामावर पुन्हा रुजू होणार नाही, असा पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे.

या जाहिरातीनुसार वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. कंत्राटी पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात येईल.

इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करु शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा